राजापुरात तीन बिबट्यांचा दुचाकीस्वारावर हल्ला; तरुण गंभीर जखमी

राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धास्तीला पुष्टी देणारी नवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. पेंडखळे येथील चिपटेवाडी फाटा परिसरात अचानक तीन बिबट्यांनी दुचाकीस्वारावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेत अनिल चिपटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुनिल माळी आणि संकेत किनरे हे दुचाकीवरून जात असताना रस्त्यात बिबट्याची पिल्ले दिसली. तेव्हा मोठ्या बिबट्यांनी डरकाळ्या फोडत त्यांचा 200-300 मीटर पाठलाग केला. त्यांनी गावकऱ्यांना इशारा देत व्हॉट्सअॅप ग्रुपवर माहिती शेअर केली होती. दरम्यान, काही वेळानंतर अनिल चिपटे हे त्याच मार्गाने जात असताना अचानक तीन बिबट्यांनी त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. त्यात ते खाली पडून गंभीर जखमी झाले.

सौंदळ-आडवली येथे काही दिवसांपूर्वी प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात रिक्षाचे नुकसान होऊन चालक जखमी झाला होता. तर वाटूळ परिसरातही वाहनचालकांना बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर वनविभागाने पेंडखळे येथे जाऊन पाहणी केली. “अनिल चिपटे यांची विचारपूस करण्यात आली असून त्यांना आवश्यक सहकार्य केले जाईल. घाबरून पडल्यामुळे त्यांना अधिक दुखापत झाली आहे. ग्रामस्थांशी चर्चा करून जनजागृतीबरोबरच बिबट्यांना जेरबंद करण्याच्या उपाययोजना राबवल्या जातील,” अशी माहिती राजापूरचे वनपाल जयराम बावदाने यांनी दिली.