
>> प्रा.शरयू जाखडी
आळंदीचे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण विठ्ठलपंत व त्यांची सत्शील पत्नी रखुमाई या जोडप्याची निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चार मुले. निवृत्ती हा शिवाचा व ज्ञानेश्वर हा महाविष्णूचा अवतार तर सोपान हा ब्रह्मदेवाचा अंश आहे. मुक्ताबाई ही प्रज्ञाशालीनी देदिप्यमान दीपशिखा क्षणात विश्व उजळून टाकणारी आदिमाया होती. संतमंडळीतील तिचे योगदान प्रेरणादायी आहे. लोकछळाला कंटाळून एकदा ज्ञानेश्वरांनी रागावून ताटी लावून स्वत:ला बंदिस्त केले. तेव्हा त्यांना कार्यप्रवृत्त करणारी त्यांची छोटी बहिण मुक्ताबाई होती. मुक्ताबाईनी उत्स्फूर्तपणे ताटीच्या अभंगाची रचना करून ज्ञानदेवांना त्यांच्या अवतारकार्याची जाणीव करून दिली ती म्हणते, चिंपोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा । योगी पावन मनाचा। साही अपराध जनांचा। विश्व रागे झाले वन्दी। संतमुखे व्हावे पाणी। तुम्ही तरून विश्वतारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।। ज्ञानेश्वर ताटी उघडून बाहेर आले व त्यांनी मुक्ताईला जनक केले. ताटीचे अभंग हे तत्त्वज्ञानाचे अप्रतिम उद्बोधन आहे. प्रसंगी मुक्ताबाई कर्तव्यकठोर होऊन परखड शब्दांत अभिप्राय व्यक्त करीत असे. असे असले तरी तिच्यात विश्वमाऊलीची प्रेमळ अथांगता अपरंपार होती. ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर काही दिवसात तापीतीरावर मुक्ताईनगर येथे वीज चमकावी तशी ती पंचतत्त्वात विलीन झाली.