राजमुद्रा  – ऋषितुल्य व्रतस्थ संशोधक

>> निखिल बेल्लारीकर 

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे सर म्हणजे खऱया अर्थाने मराठय़ांच्या इतिहासाचा चालताबोलता कोश. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संशोधकांचा आणि इतिहासप्रेमींचा खरा आधारवड हरपला आहे

नुकतेच प्रख्यात शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे ऊर्फ मेहेंदळे सर या जगातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने फक्त एक महान संशोधकच नाही, तर इतर अनेक संशोधकांचा आणि इतिहासप्रेमींचा खरा आधारवड हरपला. राजवाडे वगैरे जुन्या इतिहासकारांना काही आम्ही पाहिले नाही, पण मेहेंदळे सरांना मात्र जवळून पाहता आले हे आमच्या पिढीचे मोठे भाग्यच म्हटले पाहिजे. सर म्हणजे खऱया अर्थाने मराठय़ांच्या इतिहासाचा चालताबोलता कोश होते. पण त्या इतिहासाकडे वळण्याचा त्यांचा प्रवासही एकदम हटके आहे. वयाच्या अवघ्या 24-25 व्या वर्षी बांगलादेश युद्धाच्या बातम्या देण्याकरिता माहिती गोळा करावी म्हणून ते तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजेच आजच्या बांगलादेश हद्दीतही जाऊन आले. तिथे व आसपासच्या भागात बरेच हिंडून माहिती गोळा करून त्यांनी त्यावर एक इंग्रजी पुस्तकही लिहिले. मात्र तत्कालीन सैन्याचे त्यात नावनिशी अनेक उल्लेख असल्यामुळे सैन्यदलाने त्याच्या प्रकाशनास हरकत घेतली. त्यानंतर ते मराठय़ांच्या इतिहासाकडे वळले.

त्यांनी अनेक वर्षे अभ्यासात घालवली. शिवचरित्र हा एकांतिक ध्यास मनात ठेवून त्यासाठी अक्षरश जंग जंग पछाडले. मग ते फारसी, पोर्तुगीज, इ. भाषा शिकणे असो किंवा आवश्यक ती कागदपत्रे बघण्याकरिता अनेक ठिकाणचे दफ्तरखाने पालथे घालणे असो. हळूहळू संगती लागत गेली. काटेकोर पुराव्यांवर आधारित शिवचरित्राची भक्कम इमारत तयार झाली. 1998 साली त्यांच्या दोन खंडी मराठी शिवचरित्राची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. हे शिवचरित्र म्हणजे एकदम तर्ककठोर आहे. कुठेही भावनेचा फुलोरा नाही की साहित्यिक भाषेतील वर्णने नाहीत. पण शेकडो तळटीपांमधून बारीकसारीक गोष्टींचे त्यांनी किती सखोल अध्ययन केले हे लक्षात येते. हे दोन्ही खंड वाचले की इतिहासाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते.

शिवचरित्रकार म्हणून प्रसिद्ध असले तरी इतिहासातले सरांचे पहिले प्रेम हे पहिल्या आणि दुसऱया महायुद्धाचा इतिहास हे होते. एकीकडे मोडी पत्रे आणि फारसी तवारिखा वाचत असतानाच सर हे आधुनिक काळातील युद्धपद्धती, लॉजिस्टिक्स, इत्यादींवर इतके भरभरून बोलायचे की, ते निव्वळ ऐकत राहावेसे वाटायचे. डिफेन्स स्टडीजचे पदवीधर असल्यामुळे सरांना एकूणच मिलिटरी हिस्टरी अर्थात सामरिक इतिहासात प्रचंड रस होता. त्यांचे ऐकल्यावर इतर अनेकांचे विवेचन म्हणजे कोण्या झाडाचा पाला. पहिल्या आणि दुसऱया महायुद्धाबद्दल हजारो पाने सरांनी त्यांच्या नेहमीच्या संदर्भपरिप्लुत पद्धतीने लिहून ठेवली होती, परंतु अद्याप ती प्रकाशित नाहीत.

मध्ययुगीन भारतातील इस्लामी सत्ता म्हटले की त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर पांघरूण घालायचे आणि त्यासाठी खोटेनाटे तर्क द्यायचे हा एक कुटिरोद्योग गेली अनेक वर्षे बोकाळलेला आहे. यात अनेक प्रतिष्ठित लेखक, प्राध्यापक इत्यादींचाही समावेश आहे. मध्ययुगीन इस्लामी इतिहासातील सत्य सांगितले तर वर्तमानकाळातील सामाजिक सलोखा बिघडेल अशी गर्भित धमकीही अनेकांकडून दिली जाते. या अभ्यासकांच्या दाव्यांमधील फोलपणा सरांनी त्यांच्या अनेक व्याख्यानांमधून थोडक्यात तर सांगितलाच. शिवाय मध्ययुगीन इस्लामी सत्तांच्या धार्मिक धोरणाचा परामर्श घेणारी त्यांची ग्रंथमाला बहुतांशी लिहून तयार आहेच. त्यातील इस्लामची ओळख हा पहिला भाग प्रकाशित झालेला आहे. दुसरा औरंगजेबावरचा भागही होईलच.

हा झाला सरांच्या वैयक्तिक लेखनकार्याचा संक्षिप्त आलेख पण यापलीकडे त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाला ऊर्जितावस्था येण्याकरिता किती प्रयत्न केले ते शब्दांत सांगता येणार नाही. माझ्यासारख्या अनेक संशोधकांची कारकीर्दच मुळात सरांना वाट पुसत झालेली आहे. नवनवीन गोष्टी शिकण्यास ते नेहमी उत्सुक असत. वय वर्षे सत्तरनंतर ते कार ड्रायव्हिंग शिकले. इतकेच नव्हे, तर जर्मन भाषेचाही अभ्यास त्यांनी अलीकडेच सुरू केला होता. सततच्या अभ्यासातून विरंगुळा म्हणून नेटफ्लिक्समधील काही अ‍ॅक्शन व थ्रिलर सीरिजही ते बघत. सरांचा स्वभाव प्रसिद्धिपराङ्मुख व अंतर्मुख असला तरी ते माणूसघाणे आजिबात नव्हते. एखाद्या ऋषीसारखे निखळ ज्ञानोपासक जीवन ते जगले. त्यांच्याशी बोलायचे म्हणजे श्रवणभक्तीचा नितांतसुंदर अनुभव नेहमीच येत असे. आमचीच झोळी फाटकी. इंग्रजीत म्हणतात तसे ते लास्ट ऑफ दि रोमन्स होते. त्यांच्या जाण्याने भारत इतिहास संशोधक मंडळातल्या त्या ऋषितुल्य व्रतस्थ संशोधकांचे युग खऱया अर्थाने संपले. मराठय़ांच्या इतिहासाचा साक्षेपी आणि वस्तुनिष्ठ अभ्यास हीच सरांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल. बघू, पुढच्या पिढीला जमते का!

[email protected]

(लेखक इतिहास संशोधक आहेत.)