
>> शुभांगी बागडे
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध कादंबरीकार. ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारित त्यांचे साहित्य कायमच लोकप्रिय ठरले आहे. सखोल संशोधन, भाषेची ताकद, चित्रणातील नाटय़मयता आणि मानवी भावभावनांचे जिवंत दर्शन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टय़े. सातारा येथे होणाऱया 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
प्रयोगशील लेखन खुलेपणाने स्वीकारले जात नाही, असा आक्षेप घेतला जातो. अर्थात वाचकवर्गात भेद असणारच. ललित, ललितेतर वाचन, ऐतिहासिक, वाङ्मयीन साहित्य असे वाचकवर्ग दिसतातच आपल्याला. हा वाचकाच्या प्रकृतीधर्माचा परिणाम असतो. मात्र प्रयोगशील लेखनाबाबत मी म्हणेन की, वाचकांपेक्षा लेखकच कुठेतरी कमी पडत आहेत. लेखकांनी अधिक सकस, उत्तम असं लिहिले पाहिजे. अधिक मेहनत घेत लेखणी चमकदार बनवली पाहिजे. त्यांनीही यासाठी भरपूर वाचले पाहिजे. अर्थात पूर्वीच्या काळी लेखन आणि पुस्तकं हीच माध्यमं होती. सोशल मीडियाचा व्यत्यय नव्हता. साहित्याशी एकनिष्ठ राहत लेखन होत असे. अशा वेळी एका बाजूला तंत्राचा विजय होत असताना तंत्रापेक्षा साहित्याचा मंत्र किती मोठा आहे हे लेखकाने सिद्ध केले पाहिजे. म्हणूनच वाचनाच्या, लेखनाच्या लाटा पुन्हा यायला हव्यात.
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तुम्ही भूषवणार आहात. या निवडीबाबत काय सांगाल?
– सातारा येथे होणाऱया मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून झालेली निवड अर्थातच आनंददायी आहे. सातारासारख्या पुण्यभूमीत हे अध्यक्षपद लाभले आहे याचा आनंदच आहे. प्रत्येक मराठी लेखकाचं एक स्वप्न असतं की, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळावं. माय मराठीतल्या तमाम वाचकांच्या आशीर्वादानं मला हा सन्मान मिळतोय. याआधी 2009मध्ये देखील मला अध्यक्षपदासाठी आग्रह करण्यात आला होता; परंतु अध्यक्षपदासाठी सध्याचीच वेळ योग्य आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून असलेली आव्हाने आणि उपक्रम काय सांगाल?
– साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना काही नवे प्रघात पाडावेत आणि नवे मानदंड निर्माण करावेत असा मानस आहे. मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीला पुन्हा पुस्तकांच्या जगात घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने ‘पुस्तकाचे गाव’ ही संकल्पना प्रत्येक जिह्यात विस्तारण्याचा विचार आहे. नवीन वाचकवर्गासाठी वेगळ्या प्रयोगांची गरज आता आहे. आताच्या कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या जगातला जो वाचकवर्ग आहे तो मराठी भाषेपासून, साहित्यापासून भरकटत आहे. त्यांना पुन्हा वाङ्मयाच्या प्रांगणाकडे आणणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणून मराठी भाषेचा केवळ जयघोष न करता मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, जतनासाठी, वृद्धीसाठी लोक कायम कसे जागृत राहतील यासाठी संस्थात्मक प्रयत्न व्हावेत या दृष्टिकोनातून मी विचार करीत आहे. मराठी भाषेचे संवर्धन असं म्हणताना मूलत लेखकांसाठी चांगले प्रयोग होणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी काय करता येईल याचा विचार होत आहे. मराठीतील नवलेखकांना कोणतीही व्यासपीठं राहिलेली नाहीत. पूर्वी अनेक सुंदर मासिकं असायची, त्यातून त्यांना लेखनाची संधी मिळायची. आता तशी वाङ्मयीन मासिकं उपलब्ध नाहीत. नवलेखकांच्या कथा, कादंबऱयांची तितकी समीक्षा होत नाही. हे सारं पाहता पुढे काय करता येईल याबाबत संबंधित लेखक, संस्थांशी विचारविनिमय केला जाईल.
तुम्ही ऐतिहासिक, सामाजिक, ग्रामीण अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे लेखन केले. यातील कोणत्या लेखनाविषयी जास्त आत्मियता वाटते?
– मला नेहमी असं वाटतं की, साहित्य ही माणसांची गोष्ट असते. तांत्रिकदृष्टय़ा लेखनाच्या केलेल्या मांडणीत हा राजकीय, सामाजिक, ग्रामीण विषय असं आपण म्हणतो; परंतु या सगळ्या माणसांच्या गोष्टी असतात. अनुभवास आलेल्या या सगळ्या गोष्टींकडे मी माणूस या नजरेने पाहतो आणि त्यामुळे सगळेच साहित्यप्रकार मला भावतात.
इतक्या वैविध्यपूर्ण लेखनप्रवासात ‘पानिपत’कार हेच बिरूद, ही ओळख तुम्हाला लाभली आहे, याबद्दल कसं वाटतं?
– ‘पानिपत’मुळे लाभलेली ओळख फार आनंददायी आहे. फार समाधान वाटतं. पानिपत हा विषय आजचा विषय आहे, पूर्वीचा नाही. पानिपत हे एक प्रतीक म्हणून मी घेतलेलं होतं. मराठी माणूस एका बाजूने किती कर्तबगार आहे आणि त्याचे जे काही अंगभूत दुर्गुण असतात त्याचा परिणाम म्हणून आपल्याला कसं पानिपताला तोंड द्यावं लागलं हे दोन्ही प्रकारे मांडलं आहे. मराठी माणसाच्या विजिगिषु वृत्तीचे श्रेष्ठत्व आणि न्यूनत्व या दोन्हींचे प्रतीक म्हणून मी पानिपताला निवडले होते.
आपल्याकडे ऐतिहासिक संदर्भावर आधारित लेखन प्रत्येक वेळी वादाचे मुद्दे का ठरतात?
– हे खरंच आहे. सखोल संशोधनानंतरही याबाबत मतमतांतरे होणार हे गृहितच धरले जाते आता. याबाबत वाचकांच्या म्हणण्यापेक्षा समाजाच्या, लोकांच्या वृत्ती-प्रवृत्ती फार वेगळ्या आहेत. त्यांना सतत उत्तर देण्यापेक्षा लेखन होत राहावे, लेखकाने इतकेच लक्षात ठेवावे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे संमेलनानंतर केवळ कार्यक्रमाचं उद्घाटन आणि तत्सम स्वरूपाच्या कार्यक्रमांत दिसतात. खरंतर त्यांच्याकडून वेगळ्या प्रयोगशील कामांची अपेक्षा असते. ही प्रथा मोडीत काढणार का?
– अर्थात… अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हे 99वे वर्ष. आपणा मराठी भाषिंकांसाठी हा गौरवाचा क्षण आहे. अशा संमेलनाचे अध्यक्षपद भूषवताना येणाऱया जबाबदाऱया, भूमिका या योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी माझे प्रयत्न असतीलच. मी लोकांमध्ये मिसळण्याचा, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. नव्या वाचकांना, नवीन लेखकांना भेटेन. नव्या लेखकांविषयी जाणून घेण्याचा, त्यांविषयी लिहिण्याचा माझा कायम प्रयत्न असतो. या कार्यकाळात त्याला अधिक व्यापक स्वरूप मिळेल, समाजातील प्रत्येक स्तराला साहित्याची गोडी लागेल यासाठी अभिनव उपक्रम राबवण्याचा मानस आहे.
संमेलनात अध्यक्षीय भाषण हे कायमच कुतूहलाचा आणि कधीकधी वाद, टीका यांचा मुद्दा ठरते. विद्यमान संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनाही अशा टीकेला सामोरे जावे लागले. याबाबत…
– संमेलनाला अजून बराच अवधी आहे. त्यामुळे याबाबत काही तयारी नाही; परंतु वाद टाळले जावेत, संमेलन आश्वासक पद्धतीने पार पडावे असे वाटतेच. यासाठी वैचारिक स्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य याचा प्रत्येकाने आब राखावा व त्यादृष्टीने विचार व्हावा. संमेलन आणि पुढचा कार्यकाळ साहित्यक्षेत्राला दिशा देणारा ठरावा यासाठी मी प्रयत्न करत राहीन.