विशेष – अंबे गोंधळा ये!

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे 

शारदीय आणि वासंतिक नवरात्र उत्सवात शक्तिदेवतेचं संकीर्तन गोंधळ या विधिनाटय़ाद्वारे केलं जातं. गोंधळाला पुरातन काळचं नाटक असंही संबोधतात. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गोंधळ या संकीर्तन प्रकाराची माहिती देणारा लेख.

रेणुका, अंबा, भवानी ही शक्तिदेवतेची रूपे होत. या शक्तिदेवतांचे संकीर्तन गोंधळाच्या रूपाने होते, तर शंकराचा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱया खंडोबाचे संकीर्तन जागरणातून होते. रेणुराई गोंधळ आणि कदमराई गोंधळ असे गोंधळाचे दोन प्रकार आहेत. रेणुकेचे उपासक असलेले गोंधळी सादर करतात तो रेणुराई गोंधळ, तर भवानीचे उपासक असलेले गोंधळी सादर करतात तो कदमराई गोंधळ. एकूण जे विधिनाटय़ गणांचे दल सादर करते तो गोंधळ!

रेणुका आणि तुळजाभवानी या देवतांच्या प्राचीनतेशी गोंधळाची प्राचीनता निगडित आहे. यादवकालीन आद्य मराठी वाङ्मयात गोंधळाचे उल्लेख आहेत. गोंधळाचा संबंध भूतमातेच्या महोत्सवाशी जोडला जातो. ‘वरंगळचा गणपती काकतीयाचा गजसेनाप्रमुख जायण याने इ. स. 1240मध्ये रचलेल्या ‘नृत्यरत्नावली’त अशी माहिती दिली आहे, की कल्याणीचा चालुक्य राजा सोमेश्वर तृतीय (भूलोकमल्ल) याने आपल्या राजधानीत भूतमातृमहोत्सवाच्या प्रसंगी गोंधळाचा कार्पाम केला होता.

भूतमातेच्या महोत्सवाचे उल्लेख सातव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत आहेत. ‘संगीतरत्नाकर’, ‘संगीतसमयसार’, ‘नृत्यरत्नावली’, ‘औमापतम्’, ‘भरतार्णव’ इत्यादी संगीत-नृत्यविषयक ग्रंथांत गोंधळाचा समावेश ‘गौंडली नृत्य’ या नावाने झालेला आहे. ‘गौंडली’, ‘गुंडली’, ‘गोंडली’, ‘कुंडली’ असे त्याचे अनेक नामपर्याय आढळतात.

परशुराम हा आपला मूळ पुरुष आहे, असे गोंधळी सांगतात. जमदग्नी आणि रेणुका यांच्यापासून आपली उत्पत्ती झाली आहे, अशी त्यांची धारणा असते. ‘रेणुकामाहात्म्य’ या ग्रंथात अशी कथा आहे की, परशुरामाने बेटासुर नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर त्याचे शिर तोडले. त्या शिराच्या ब्रह्मरंध्रात त्याच्याच शिरांचे तंतू ओवले आणि ते खांद्यावर घेऊन ‘तिंतृण तिंतृण’ असा ध्वनी काढीत तो मातेजवळ आला. बेटासुराच्या धडाचे आणि शिराचे बनविलेले चौंडके वाजवून परशुरामाने जे पहिले मातृवंदन केले, त्यातच गोंधळाची प्रथा उगम पावली.

गोंधळामध्ये चौंडके हे वाद्य वाजविले जात नाही, तर संबळ आणि तुणतुणे ही दोन वाद्ये वाजविली जातात. चौंडके हे वाद्य जोगती वाजवितात. गोंधळी हे लोकसंस्कृतीचे उपासक असून त्यांना आपण लोकपुरोहित किंवा लोकदीक्षित म्हणू शकतो. गोंधळ हा कुळधर्म-कुळाचार म्हणून मराठी लोकसंस्कृतीत लोकप्रिय होता आणि आजही आहे. भागवत संप्रदायी संतांनी आध्यात्मिक उद्बोधनासाठी गोंधळाचे रूपक वापरले आहे. दासोपंतांच्या गीतार्णवातील एका ओवीत गोंधळाचा उल्लेख आहे, तो असा –

भूतांचा गोंधळी पडिलें।

ते माणूस नव्हे आपलें।

जैसें पापा अधीन जालें। जिणें होईल।

तर, संत एकनाथांनी गोंधळावर पुढीलप्रमाणे रूपक केले आहे-

सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो।

ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो।।

चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो।

घालुनी सिंहासन वरुते घट स्थापियेला वो।।

लोकसंस्कृतीचे दिवंगत अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी प्रत्यक्ष मुलाखतीत गोंधळासंबंधी विवेचन केले ते असे- ‘आज गोंधळ हा लोकधर्मीय विधी रेणुका, तुळजाभवानी, अंबा अशा देवतांच्या उपासनेशी निगडित आहे. भूतमाता भूतकालाच्या गडद गाभाऱयात दिसेनाशी झाली आहे. गोंधळ्यांना आणि भुत्यांना तिची स्मृतीही उरलेली नाही. परंतु त्यांच्या नावांतून त्यांच्या मूळ उपास्याचे सूचन स्पष्ट होत असल्यामुळे आपणास विस्मृतीच्या अंधाराचा वेध घेणे शक्य झाले आणि प्राचीन मराठी वाङ्मयातील अनेकानेक पुराव्यांच्या प्रखर प्रकाशात भूतमातेचे आणि तिच्या परिवाराच्या भीषण उपासना नृत्याचे जवळून दर्शन घेता आले. सहा-सातशे वर्षांपूर्वी केव्हा तरी ही भूतमाता रेणुका आणि तुळजाभवानी या लोकप्रिय देवींच्या प्रभावापुढे फिकी पडत राहिली आणि तिचा उपासकगण रेणुकेच्या आणि तुळजाभवानीच्या उदोकारात रंगता रंगता सौम्य होत राहिला. या परिवर्तनाची कहाणी आज सर्वांगानी स्पष्ट होत नसली तरी उपलब्ध साधनांच्या सहाय्याने आपण तिची काहीशी कल्पना करू शकतो.’

गोंधळ आणि जागरण या कुळधर्म-कुळाचारांच्या साम्यभेदांचा परामर्श घेताना लक्षात येते की, गोंधळ आणि जागरण ही दोन्ही विधिनाटय़े कुळधर्म-कुळाचार म्हणून ओळखली जातात. देवता आवाहन, देवता आवतरण, देवता संचार, देवता संकीर्तन आणि देवता निर्गमन संकेत दोन्ही कुळधर्म-कुळाचारांत सारखेच असतात. उपास्य देवतेच्या पूजेआधी शुचिर्भूत करून घेणे दोन्ही कुळाचारांत अनिवार्य असते. उपास्य देवतेची घटस्थापना, दिवटी प्रज्वलन दोन्ही कुळाचारांत आवश्यक असते. पूर्वरंग आणि उत्तररंग या दोन्ही भागांत गोंधळ-जागरण सादर होते. पूर्वरंगाचा आणि उत्तररंगाचा आकृतिबंध सारखा असतो. हा आकृतिबंध असा- पूर्वरंग-शिवस्तुती-देवतांना रंगस्थळी पाचारण-गण-गौळण-स्फुट पदे. उत्तररंग-कथेचे सादरीकरण, आरती, ओझं उतरणे. पण गोंधळात देवदासी वर्गातील स्त्री उपासक नसते, तर जागरणात वाघ्यासोबत मुरळी असते. आज मुरळी प्रथेला कायद्याने बंदी आहे, त्यामुळे जागरणात एखादी कलावंत महिला मुरळीची भूमिका पार पाडते.

कदमराई गोंधळात किंवा हरदासी गोंधळात कथा नाटय़ात्म पद्धतीने सादर होते. गोंधळातील कथा सादरीकरणात रंगभूषा, वेषभूषा यांचे विशेष अवडंबर नसते. तसेच गोंधळात संबळ, तुणतुणे, मंजिरी या वाद्यांचा वापर होतो. तर जागरणात दिमडी, तुणतुणे, मंजिरी व घाटी ही वाद्ये वापरली जातात. पद गायन निरूपण-संपादणी, कथेतील पात्रांचे संवाद, पुन्हा गायन असे गोंधळाचे आणि जागरणाचे आविष्कारसूत्र  सारखेच असते. तसेच गोंधळ आणि जागरण दोहोंच्या घटस्थापनेसाठी लागणारे देवीदेवतांचे टाक व पूजासाहित्यदेखील सारखेच असते.

गोंधळ आणि जागरण, दोन्ही कुळाचार कामनापूर्तीपोटी केले जातात. शंकराचे रूप असणारा खंडोबा आणि शक्तिदेवतेची रूपे असणारी अंबा, भवानी, रेणुका या सकाम भक्तीच्या देवता आहेत. या सकाम भक्तीच्या देवतांपुढे नवस केले जातात. हे नवस विशिष्ट हेतूंनी प्रेरित होऊन करण्यात येतात. नवसांनुसार इच्छित फलप्राप्ती झाली की फलप्राप्तीच्या पूर्तीनिमित्त जागरण, गोंधळ हा कुळधर्म-कुळाचार पार पाडला जातो.

एकूण देवीचा गोंधळ ही सकाम भक्ती-उपासना आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत तिच्या नावाने केला जाणारा जागर, म्हणजे तिच्या स्त्रीशक्तीचा आणि सर्जनाचा केला जाणारा उत्सवच आहे. तसंच तिच्या नावाने घातलेला गोंधळ म्हणजे तिचा केलेला उदोउदोकारच आहे!

[email protected]

(लेखक लोककलेचे अभ्यासक आहेत.)