मुंबई ते दिल्ली बुलेट ट्रेन करा आम्ही स्वागत करू- संजय राऊत

मुंबईचा घास गिळण्यासाठी तुम्हाला अहमदाबाद बुलेट ट्रेन हवी आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुंबई ते दिल्ली बुलेट ट्रेन करा आम्ही स्वागत करू असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला बुलेट ट्रेन दिल्ली ते मुंबई दरम्यान करता आली असती. ती अहमदाबाद ते मुंबई का करताय? भविष्यात तुम्हाला मुंबईचा घास गिळायचा आहे. मुंबई ते दिल्ली बुलेट ट्रेन करा आम्ही स्वागत करू. मुंबई अहमदाबादचा का?

रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकल्याने एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईत असे रोज मृत्यू होत आहे. या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही योजना, भूमिका आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे हे फडणवीसांना वाहतूक कोंडी प्रकरणी भेटले होते. त्यांनी पुन्हा भेटावं आणि हा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवावा.

4 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे पुण्यात आहेत. त्यानंतर पुढल्या आठ दिवसांत ते मराठवाड्यात जात आहेत. पुण्यात दिवसभर त्यांचे कार्यक्रम आहेत, शाखाप्रमुखांचा मेळावा आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी बँकेसंदर्भात कार्यक्रम घेतला आहे. मराठवाड्यात पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आहे.

भाजपचे लोक एकमेकांचा बाप काढत आहेत, ही सुरूवात नारायण राणे यांच्या मुलांनी केली. त्यांना फडणवीसांनी अभय दिलं आणि त्यानंतर ही घाण वाढत गेली. आपण एक आमदार आहात, एखादा चुकीचा शब्द जाऊ शकतो. आमच्या तोंडून एखादा शब्द जातो. पण आम्ही कुणाचा बाप नाही काढला, बापाचं कर्तृत्व नाही काढलं. राजारामबापू यांनी सहकारक्षेत्रात फार मोठं योगदान दिलेलं आहे, त्यांचा स्वातंत्र्य चळवळींशी निकटचा संबंध आला, त्यांच्या विषयी कुणी बोलावं आणि कोणत्या भाषेत बोलावं हे जर भाजपच्या लोकांना कळत नसेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा लावला असे मला म्हणावं लागेल. बारामतीत जाऊन शरद पवारांविषयी वाईट बोलता. फडणवीसांनी त्यासाठी ठराविक माणसं नेमली आहेत. ही टीम फडणवीस आहे. आणि फडणवीस ज्या संस्कार आणि संस्कृतीच्या गोष्टी करतात त्यांच्या टीममधल्या लोकांची त्यांनी शाळा घ्यावी. कठोर शब्दात टीका करा. पण हे लोक विधानसभेत मारामाऱ्या करतात. या माणसाने फक्त बंदुका काढायच्या बाकी ठेवल्यात. हे लोक गुंडासारखे फिरतात आणि फडणवीसांसोबत चहा पितात. फडणवीसांनी या व्यक्तीला 12 ते 13 वेळा समज दिली आहे असं मी वृत्त वाचलं. त्यानंतरही ही व्यक्ती वाचत असेल तर त्या व्यक्तीला तुमचा पाठिंबा आहे. जयंतरावांवर तुमचा राग यासाठी आहे की जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाही. जे स्वातंत्र्य चळवळीतून पळून गेले ते स्वातंत्र्य चळवळीत असणाऱ्या लोकांबद्दल अपमानास्पद बोलतात अशा लोकांना लाजा नाही वाटत असेही संजय राऊत म्हणाले.