
H-1B व्हिसावर नवीन शुल्काचा नियम लागू होण्याआधीच अमेरिकन IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या परदेशी कर्मचाऱ्यांना, विशेषत: हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांना, एका ईमेलद्वारे आदेश जारी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत 1 दिवसाच्या आत अमेरिकेत परत येण्याची सूचना या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
मायक्रोसॉफ्टने हिंदुस्थानात प्रवास करत असलेल्या आपल्या H-1B कर्मचाऱ्यांसाठी तातडीचा सूचना जारी केली आहे. 21 सप्टेंबरनंतर त्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यास अडथळा येऊ शकतो असे कंपनीने कर्मचाऱ्यांना म्हटले आहे.
जोपर्यंत त्यांची कंपनी 10 हजार डॉलर्सचे शुल्क भरलेले नसेल तोपर्यंत 21 सप्टेंबरनंतर अमेरिकेबाहेर असलेल्या कोणत्याही H-1B कर्मचाऱ्याला परत येण्याची परवानगी दिली जाणार नाही, हा खर्च फक्त अत्यावश्यक किंवा उच्चस्तरीय पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच केला जाईल. याचा थेट अर्थ असा की इतर परदेशी कर्मचाऱ्यांच्या नोकरीत अडथळा येऊ नये, यासाठी 21 सप्टेंबरपूर्वी अमेरिकेत परत येणे गरजेचे आहे. कंपनीने हा ईमेल कर्मचाऱ्यांना अंतर्गत पातळीवर पाठवण्यात आला असून कंपनीच्या परिचित असलेल्या लोकांनी याला दुजोरा दिला आहे.
मायक्रोसॉफ्टने अमेरिकेत आधीपासूनच असलेल्या H-1B व्हिसा होल्डर्सना सल्ला दिला आहे की त्यांनी आपली प्रवासाची योजना रद्द करावी आणि ‘निकट भविष्यकाळात’ अमेरिकेतच राहावे. जरी या घोषणेत H-4 व्हिसाधारकांचा थेट उल्लेख नाही, तरी कंपनीने त्यांच्या पती किंवा पत्नी आणि मुलांनाही आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
हिंदुस्थानच प्रवासावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या लवकर परतण्यास सांगितले जात आहे. प्रवासाची मर्यादित वेळ सर्वांसाठी सोयीस्कर नसेल, पण एकमेव सुरक्षित पर्याय म्हणजे नियम लागू होण्यापूर्वी अमेरिकेत परत जाणे हा महत्त्वाचा पर्याय त्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.
ट्रम्प यांच्या H-1B व्हिसावर नवीन शुल्क नियमामुळे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे. H-1B व्हिसा मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक हिंदुस्थानी नागरिक असल्याने या निर्णयाचा हिंदुस्थानच्या आयटी क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
21 सप्टेंबर 2025 पासून लागू होणाऱ्या नियमांनुसार, अमेरिकन कंपन्यांना कोणत्याही परदेशी कर्मचाऱ्याच्या प्रवेशासाठी किंवा पुनःप्रवेशासाठी प्रत्येक H-1B अर्जावर 1 लाख डॉलर्स (सुमारे 88.10 लाख रुपये) भरावे लागतील. हा नियम सर्व परदेशी कर्मचाऱ्यांवर लागू होतो, ज्यांच्याकडे H-1B व्हिसा आहे किंवा ते त्यासाठी अर्ज करत आहेत. जर एखादा कर्मचारी H-1B व्हिसा होल्डर असेल आणि हिंदुस्थान फिरायला आला असेल, तर अमेरिकेत पुन्हा जाण्यावरदेखील हा नियम लागू होईल आणि जोपर्यंत त्याची कंपनी ही रक्कम भरत नाही, तोपर्यंत त्याला अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.