
कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. नाटकाच्या मध्यांतरावेळी उपाहारगृहचालकाने प्रेक्षकांना चक्क एक्सपायरी संपलेले कोल्ड्रिंक्स दिले. काही दक्ष नागरिकांनी कोल्ड्रिंक्सवरील तारीख तपासली असता मुदत संपल्याचे लक्षात आले. त्यानंतर नाट्यगृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. प्रेक्षकांनी उपाहारगृहचालकाला याचा जाब विचारला. त्यानंतर चालकाने त्याची चूक मान्य केली.
आचार्य अत्रे नाट्यगृहात गुजराती नाटक सुरू होते. नाटकाच्या मध्यांतरावेळी प्रेक्षक नाट्यगृहातील उपाहारगृहात नाश्ता करण्यासाठी गेले. यावेळी काहींनी कोल्ड्रिंक्स घेतले आणि जागेवर जाऊन बसले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. दरम्यान यातील काही दक्ष नागरिकांनी कोल्ड्रिंक्सवरील तारीख तपासली असता त्याची एक्सपायरी संपल्याचे दिसून आले. तत्काळ त्यांनी उपाहारगृहचालकाला याबाबत विचारणा केली. तसेच फ्रीजमधील कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या तपासल्या तेव्हा सर्वच बाटल्या कालबाह्य (एक्सपायर्ड) असल्याचे समोर आले. यावर संतप्त प्रेक्षकांनी उपाहारगृहचालकाला जाब विचारला. चालकाने चूक मान्य करत ‘मी एक्सपायरी डेट तपासली नव्हती,’ असे सांगितले.
मोठी दुर्घटना टळली
प्रेक्षकांनी पोलिसांना बोलावले. कल्याण बाजारपेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या सर्व एक्सपायरी डेटच्या कोल्ड्रिंक्स बाटल्या जप्त केल्या. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रेक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.