मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केंद्राने तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी – उद्धव ठाकरे

आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड,, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेलं आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती.पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवेला झाला पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही. अतिशय तुटपुंजी मदत दिली.

शेती AI च्या मदतीने करा असा सल्ला ही सरकार शेतकऱ्यांना देतंय पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत आहेत. एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. मराठवाड्याला सापत्न वागणूक देताय.
साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला सीएम आणि DCM ना वेळ नाही.

नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्ही समोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे आणि टेबल न्यूज तयार करणे सुरू आहे

आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता. जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे. गुरे ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार? केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश द्यावे. शेतकऱ्यांच्या बाबतीतही पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका. पहिल्यांदा छान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा. जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या. ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा. स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या असेही उद्धव ठाकरे म्हणाले.