अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल (एस.पी.व्ही.) नगरातील 498 भूखंडांवरील सुमारे 4 हजार 973 सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून क्लस्टर पद्धतीने राबविण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
सरदार वल्लभभाई पटेल नगरातील भूखंडाचे जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत 1993 मध्ये वाटप करण्यात आले होते. तिथे 98 सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. तसेच उच्च उत्पन्न गटांतील अपार्टमेंटअंतर्गत 24 भूखंड आहेत. याशिवाय वैयक्तिक प्रकारात साठ चौरस मीटर क्षेत्रफळाचे 62 व 100 चौरस मीटर क्षेत्रफळाचे 245 भूखंड आहेत. तेथील इमारतींचा विकास नियंत्रण नियमावलीनुसार पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव म्हाडाने दिला आहे.
क्लस्टर पद्धतीने पुनर्विकास केल्यास रहिवाशांना प्रशस्त घरे देता येणार आहेत. हरित क्षेत्र, शाळा, आरोग्य सुविधा, व्यावसायिक जागा यांचे टाऊनशिप पद्धतीने नियोजन करता येणार आहे. खेळाचे मैदान, करमणुकीसाठीचे मैदान, व्यायामशाळा, जलतरण तलाव, सभागृह, संस्था कार्यालय यांचा प्रकल्पात समावेश राहणार आहे. ग्रीन बिल्डिंग डिझाईन ज्यामध्ये सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण, कचरा व्यवस्थापन अशा सुविधांचाही विचार करता येणार असल्याचा सरकारचा दावा आहे.