म्हाडाला एमएसआरडीसीकडून हवेत 50 कोटी रुपये, विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी भूखंड

विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉरसाठी म्हाडाच्या शिरढोण येथील गृहप्रकल्पामधील 5 हेक्टर भूखंड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिला जाणार आहे. या भूखंडाच्या मोबदल्यात नुकसानभरपाई म्हणून 50 ते 60 कोटी रुपये मिळावेत यासाठी म्हाडाकडून आता एमएसआरडीसीकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

म्हाडाचे कोकण मंडळ कल्याणमधील शिरढोण येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तब्बल 16 हजार घरांचा प्रकल्प उभारणार आहे. यापैकी आतापर्यंत दहा हजार घरे उभारण्यात आली आहेत. शिरढोणमधील या गृहप्रकल्पामधूनच विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉरची वाट जाणार असून त्यासाठी 5 हेक्टर भूखंडाची मागणी एमएसआरडीसीकडून म्हाडाकडे करण्यात आली आहे. या कॉरिडॉरसाठी 500 मीटर लांबीचा आणि 100 मीटर रुंदीचा भूखंड एमएसआरडीसीला दिला जाणार आहे. या भूखंडाच्या मोबदल्यात 50 ते 60 कोटी रुपये मिळावेत, यासाठी एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिरढोणमधील या घरांची लॉटरी गेल्या वर्षी म्हाडाने काढली होती. मात्र या लॉटरीला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे येथील अनेक घरे धूळ खात पडली आहेत. भविष्यात येथे होणाऱ्या कॉरिडॉरमुळे येथील लोकांना कनेक्टिव्हीटीच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे.