
ठाणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाहतूककोंडी आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेले अपघात यामुळे वाहनचालक आणि प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. आज झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत या ट्रॅफिककोंडीवरून जोरदार ‘खड्डा’जंगी झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांनी या वाहतूककोंडीचे खापर विविध प्राधिकरणांच्या निष्क्रियतेवर फोडले. शिंदे यांनी तर एमएसआरडीसीचे उपअभियंता डोंगरे यांना निलंबित केले. छोटा मासा निलंबित झाला, पण बडे मासे मात्र सुशेगाद राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाणे शहरासह घोडबंदर मार्ग आणि जिल्ह्यातील इतर मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे अनेक राजकीय पक्ष तसेच नागरिक आंदोलने करीत आहेत. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यावर अवजड वाहतूक बंदी रद्द करण्याची नामुष्की दोन दिवसांतच ओढवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीपीडीसीच्या बैठकीत थेट अधिकाऱ्यांनाच जाब विचारला, तर मंत्र्यांपासून खासदार, आमदार सर्वांनीच या बैठकीत कोंडीवरून नाराजी व्यक्त केली.
भिवंडी-वडपे रस्ता अधांतरी का?
ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनीही एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी आणि एमएमआरडीए विभागांवर निष्क्रियतेचे खापर फोडले. समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत झाला. मग ठाणे-भिवंडी-वडपे रस्ता अधांतरी का? असा सवाल उपस्थित करत सहा लेनवरून दोन लेनवर होणाऱ्या बॉटलनेकमुळे कोंडी वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.