
डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला फोटो फेसबुकवर फॉरवर्ड केला होता. यामुळे संतापलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी रस्त्यात अडवून मामा पगारे यांना साडी नेसवली होती. याबाबत मामा पगारे यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर टिळकनगर पोलीस ठाण्यात भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी, दत्ता मयेकर यांच्यासह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मामा पगारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात पोस्ट केली नाही. मला जी पोस्ट आली होती ती फक्त मी फॉरवर्ड केली. जर त्यांना असं वाटत होतं की मी पंतप्रधानांचा अपमान करत आहे तर त्यांनी माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायचा होता अथवा कायदेशीर कारवाई करायची होती. परंतु त्यांनी तसे न करता गुंड प्रवृत्तीची माणसं पाठवून माझ्यासोबत असभ्य प्रकार केला.
मामाजी डरो मत… राहुल गांधी पाठीशी
भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याशी केलेल्या निंदनीय प्रकाराची दखल थेट राहुल गांधी यांनी घेतली. त्यांनी पगारे यांना फोन केला. ‘मामाजी आप डरो मत, पुरी काँग्रेस आपके पिछे खडी है, असा धीर दिला. राहुल गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात यांनी मामांना फोन करून धीर दिला
शिवसैनिकांनी दिला धीर
मामा पगारे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांच्यासह शिवसैनिकांनी रुग्णालयात त्यांची भेट घेऊन धीर दिला. यावेळी भाजपच्या असंवेदनशील कृत्याचा निषेधही केला.