
पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदुर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगर-दौंड महामार्गावरील अरणगाव परिसरात हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दगडफेकीत हाके यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून, त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
दरम्यान, याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी गोरख दळवी, संभाजी सप्रे, गणेश होळकर या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदुर येथे ‘ओबीसी एल्गार मेळाव्या’साठी आज दुपारी लक्ष्मण हाके निघाले होते. अरणगाव परिसरातील एका हॉटेलवर ते नाष्टय़ासाठी थांबले होते. पुढे जात असतानाच त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर हाके यांचा ताफा बाह्यवळण रस्त्याने सोलापूर रोडकडे रवाना झाला. दरम्यान, हाके यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत तीनजणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हाके यांचे समर्थक मोठय़ा संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले होते.
हल्लेखोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही!
‘याअगोदर माझ्यावर सात ते आठ वेळा हल्ले झाले आहेत.आमच्यामधील एकाला दुखापत झाली असल्याचे हाके यांनी सांगितले. आता संशय नेमका कुणावर घ्यायचा? हल्लेखोरांनी दोन वाहनांवर हल्ला केला आहे. दोन गाडय़ांच्या काचा फोडल्या आहेत. दोन पोलीस व्हॅन असताना, 10 ते 12 पोलिसांचा स्टाफ असताना हल्ला झाला. लाकडी बांबू आणि दगडाने हल्लेखोर हल्ला करत असतील तर त्यांना कायदा आणि पोलिसांचा धाक आहे की नाही?’ असे हाके म्हणाले.
प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच गाडीवर हल्ले – मनोज जरांगे
या घटनेवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच गाडीवर हल्ले करून घेतात. स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. हे लोक दगड मारून घेतात, हल्ले करून घेतात आणि मग त्यावर राजकारण करतात. अशा जातीयवाद पसरवणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं कारण नाहा,’ असा हल्लाबोल जरांगे-पाटील यांनी केला.