बुलेट ट्रेनची आठ स्थानकं जवळपास पूर्ण, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अतिशय जलद गतीने सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण 12 स्थानके आहेत. यापैकी 8 स्थानकांचे काम पूर्ण होण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. काही स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता आतील इंटिरियर, आवश्यक साइनबोर्ड आणि एस्केलेटर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे ट्रायल रन सुरू होण्याची अपेक्षा आहे. नुकतंच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूरत बुलेट स्टेशनला भेट देऊन पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौऱ्यानंतर लवकरच बुलेट ट्रेनच्या डिलिव्हरी प्रक्रियेला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची सुरुवात गुजरातमधील साबरमती स्टेशनपासून होईल. त्यानंतर ट्रेन अहमदाबाद स्टेशन आणि आणंद मार्गे वडोदऱ्याला पोहोचेल. वडोदऱ्यानंतर भरूच आणि मग सूरत स्टेशन येईल. त्यानंतर बिलिमोरा, वापी स्थानके आहेत. त्यानंतर चार स्थानके महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये बोईसर, विरार, ठाणे आणि बीकेसी म्हणजे मुंबईतील शेवटचे स्थानक आहे. गुजरातमधील आठ स्थानकांचे काम बर्‍याच प्रमाणात पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेनचे ट्रायल सूरत ते बिलिमोरा दरम्यान होण्याची शक्यता आहे.

बुलेट ट्रेनमुळे जिथे जलद कनेक्टिव्हिटी मिळेल, तिथेच दुसरीकडे स्थानकांवर प्रवाशांना एअरपोर्टसारख्या सुविधा मिळतील. स्थानकांना आरामदायक अंतर्गत सजावटीसह हवेशीर प्लॅटफॉर्म देण्यात आले आहेत. स्थानकांवर आधुनिक प्रवासी सुविधा जसे की प्रतीक्षालय, नर्सरी, स्वच्छतागृहे, रिटेल दुकाने उपलब्ध असतील. बुलेट ट्रेन स्टेशन बीआरटीएस बसस्टॉपपासून 330 मीटर अंतरावर आहे. प्रस्तावित मेट्रो स्टेशन 280 मीटर अंतरावर असून सूरत रेल्वे स्टेशन 11 किमी अंतरावर आहे. त्याचबरोबर सूरत सिटी बसस्टँड 10 किमी अंतरावर आहे. बुलेट ट्रेन स्टेशनला विशेष बसांद्वारे जोडले जाईल. चलथान रेल्वे स्टेशन 5 किमी अंतरावर आहे. एनएच 48 फक्त 5 किमी अंतरावर आहे.