Nanded News – आम्ही जगायचे की मरायचे ते सांगा; लोकप्रतिनिधींना फटकारत शेतकऱ्यांचा सामूहिक जलसमाधीचा प्रयत्न

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या बॅकवाटरमुळे धर्माबाद तालुक्यातील शेती पुर्णतः पाण्याखाली गेलेली आहे. असे असताना या भागाचे आमदार फिरकून पाहण्यास तयार नसल्याने रोशनगावच्या शेतकऱ्यांनी सामुहिक जलसमाधी करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुर्वी धर्माबाद शहरात भीक मागो आंदोलन करुन लोकप्रतिनिधींचा निषेधही करण्यात आला होता.

नायगाव विधानसभा मतदारसंघात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने धर्माबाद तालुक्यातील शेतातील पिकांचा चिखल झाला होता. प्रशासनाने दखल घेत पंचनामे केले, जिल्ह्याचे पालकमंत्री आले पण या भागाचे आमदार मात्र फिरकले नाहीत. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे जनावरांचे, पीकांचे, घरे व मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. संतप्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने धर्माबाद शहरातील पानसरे चौकात लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ ‘भीक मागो’ आंदोलन करत असंवेदनशील लोकप्रतिनिधीच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला होता. तरीही पाझर फुटला नाही.

मागच्या दोन तीन दिवसापासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून यामुळे धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव शिवारात आलेल्या पावसामुळे आणि प्रचंड पुरामुळे शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. उभे पीक वाया गेले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून मदतीची कुठलीही ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी अखेर सामूहिक जलसमाधी करण्याचा प्रयत्न केला.

गावातील शेतकरी शेतीकडे जमले. या प्रसंगी त्यांनी “आमच्या शेतीचे झालेले प्रचंड नुकसान, गव्हाच्या जवळ असलेली शेती जल मय झाली, जनावरांसाठी चारा नाही, तरीही प्रशासन झोपले आहे. आम्हाला जगायचे की मरायचे याचा निर्णय घ्यावा” अशी संतापपूर्ण हाक दिली. यावेळी गावातील युवा तरुण मंडळी व नागरिक तातडीने शेतकऱ्यांना समजावून जलसमाधीचा प्रयत्न रोखला. मात्र शेतकऱ्यांनी आपली मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, रोशन गावातील शेतकऱ्यांच्या जलसमाधीच्या प्रयत्नाला प्रशासनासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.