सरकारी नोकरीच्या 10 हजार नियुक्तीपत्रांचे आज वाटप

सरकारी नोकरीत काम करताना एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर वारसांना सरकारी नोकरी मिळते; पण लाल फितीच्या कारभारामुळे अनेक जण नोकरीच्या प्रतीक्षेत होते. पण यातील सरकारी स्पीड ब्रेकरचा अडसर आता दूर झाला आहे. उद्या (शनिवारी) सुमारे 10 हजार 308 उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.

शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी नियमांवर बोट ठेवून कोणाही अनुकंपाची नियुक्ती डावलली जाऊ नये यासाठी विशेष योजना तयार केली आहे.