कर्नाटकात भाजप नेत्याची भोसकून हत्या, चार जणांना अटक

कर्नाटकातून भाजप युवा मोर्चाच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील कोप्पळ येथे भाजप युवा मोर्चाच्या एका माजी स्थानिक पदाधिकाऱ्याची जुन्या वैमनस्यातून झालेल्या संशयित प्रकरणात एका टोळीने हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी पहाटे कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती तालुक्यात घडली. माजी युवा मोर्चा नेते व्यंकटेश एका मित्राला भेटल्यानंतर दुसऱ्या मित्रासोबत दुचाकीवरून परतत असताना हा प्रकार घडला. त्याच वेळी पाच-सहा हल्लेखोरांचा गट कारमधून आला आणि त्यांनी व्यंकटेशच्या गाडीला अडवून त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

कर्नाटक पोलिसांनी सांगितले की, जेव्हा हल्लेखोर व्यंकटेशला मारत होते, तेव्हा त्याचा मित्र तिथून पळून गेला. व्यंकटेशवर हल्ला केल्यानंतर आरोपी आपली कार घेऊन पळून गेले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, व्यंकटेशला रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जिल्हा पोलीस अधीक्षक राम एल. अरासिद्दी यांनी सांगितले की, पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनामध्ये सहभागी चार आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित दोषींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, या हत्येमागे वैयक्तिक वैर असल्याचा संशय आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.