1 नोव्हेंबरपासून अवजड ट्रकवर 25 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांचा आणखी एक झटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक झटका दिला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या अवजड हेवी ट्रकवर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून या टॅरिफची अंमलबजावणी केली जाणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फायदा अमेरिकेत बनवल्या जाणाऱ्या ट्रक कंपन्यांना होणार आहे.

दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणा अंतर्गत निर्णय घेत आहेत. विदेशातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर जास्तीत जास्त टॅरिफ लावण्याचा निर्णय ट्रम्प यांच्याकडून घेतला जात आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेत बनवल्या जाणाऱ्या ट्रक कारखान्यांना मोठा फायदा होईल. तर युरोपातून आयात होणाऱ्या वाहन कंपन्यांना याचा फटका बसेल. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील वाहनांच्या किंमती वाढू शकतात. जपान, जर्मनी, मेक्सिको, पॅनडा आणि फिनलँड सारख्या देशांतून अमेरिकेत सर्वात जास्त ट्रक निर्यात केले जातात. अमेरिकी सरकारी आकडेवारीनुसार, मेक्सिकोतून ट्रकची निर्यात 2019 पासून तीन पट वाढली असून 3.4 लाखांपर्यंत पोहोचली आहे. संयुक्त राज्य अमेरिका-मेक्सिको-पॅनडा समझोतानुसार, मध्यम आणि अवजड ट्रकचा व्यापार निशुल्क असतो. परंतु, ट्रम्प यांच्या नव्या 25 टक्के टॅरिफमुळे यावर परिणाम होऊ शकतो.