देश  विदेश – करूर चेंगराचेंगरी दुर्घटनेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

madras-high-court-rejects-cbi-probe-into-vijay-rally-stampede-issues-safety-guidelines

तामीळ अभिनेता विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली आहे. उद्या, 10 ऑक्टोबरला यावर सुनावणी केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका पक्षाचे महासचिव आधव अर्जुना यांनी दाखल केली आहे. या दुर्घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्रपणे करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आठ सायबर गुन्हेगारांना सीबीआयकडून अटक

सीबीआयने मे ते ऑगस्टदरम्यान सुरू केलेल्या मोहिमेत आठ सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली. ही कारवाई इंटरपोलच्या जागतिक ऑपरेशन एचएईसीएचआय-6 चा भाग होती. यात 40 देशांनी भाग घेतला. अटक केलेल्या आरोपींकडून 59 लाख रुपयांची रोकड जप्त केली, तसेच 30 बँक खाती जप्त केली. हे सायबर गुन्हेगार व्हाईस फिशिंग, ऑनलाइन सेक्सटॉर्शन, गुंतवणुकीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत होते.

अखिलेश यादव आझम खान यांना भेटले

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी बुधवारी दुपारी रामपूर येथे आझम खान यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. जवळपास तीन वर्षांनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. आझम खान आणि अखिलेश यादव यांच्यात जवळपास एक तास विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आझम खान यांना 79 गुह्यांत जामीन मिळाल्यानंतर त्यांची 24 सप्टेंबरला तुरुंगवासातून सुटका करण्यात आली होती.

पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 11 ठार

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे टीटीपी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 11 सैनिक ठार झाले. मृतांमध्ये पाकिस्तानी लष्कराचा लेफ्टिनेंट कर्नल रँकच्या एका अधिकाऱ्याचा आणि एका मेजरचाही समावेश आहे. पाकिस्तानी सैनिकांना टीटीपीचे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सर्च ऑपरेशन केले. त्या वेळी दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैनिकांवर बेछूट गोळीबार केला.

इक्वाडोरच्या राष्ट्रपतींवर जीवघेणा हल्ला

इक्वाडोरचे राष्ट्रपती डेनियल नोबोआ यांच्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केला. जवळपास 500 आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपती यांच्या ताफ्यावर हल्ला केला. जोरदार दगडफेक केली. या हल्ल्यात राष्ट्रपतींना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुरक्षित आहेत. आंदोलनकर्त्या व्यक्तींविरोधात जीवघेणा हल्ला करण्याचे कलम लावत गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रपतींच्या कारवर गोळीबार केला असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कॅलिपफोर्नियात आता दिवाळीच्या सुट्टय़ा मिळणार

अमेरिकेतील कॅलिपफोर्निया राज्यात पहिल्यांदाच अधिकृतपणे दिवाळीच्या सुट्टय़ा जाहीर करण्यात आल्या आहेत. कॅलिपफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांनी असेंबली विधेयक 268 वर स्वाक्षरी करून या विधेयकाला कायद्यात रुपांतरीत केले आहे. या कायद्यांतर्गत आता कॅलिपफोर्नियातील सरकारी कर्मचारी, कम्युनिटी कॉलेज आणि सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना दिवाळीत सुट्टय़ा मिळतील. कॅलिपफोर्नियात जवळपास 10 लाख हिंदुस्थानी नागरिक राहत आहेत.