
>> डॉ. संजय वर्मा
अलीकडेच चीन आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये माणूस दीडशे वर्षे जिवंत राहू शकतो, यासंदर्भातील संवाद उघड झाल्याने मानवाच्या दीर्घायुष्यासाठीच्या प्रयत्नांबाबतची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. आधुनिक विज्ञान वृद्धत्वाला अनियंत्रित आणि विस्कळीत प्रक्रिया मानत नाही. नव्या व्याख्येनुसार, वृद्धत्व ही नियंत्रित करता येणारी प्रक्रिया आहे आणि त्यात बदल शक्य आहेत. फक्त एवढाच फरक आहे की, हे बदल घडविण्याचे मार्ग आपल्याला अद्याप स्पष्टपणे माहीत नाहीत. ज्या दिवशी हे गूढ उलगडेल, त्या दिवशी अमरत्व किंवा किमान 120 ते 150 वर्षांचे आयुष्य ही फार मोठी गोष्ट राहणार नाही.
दीर्घायुष्य मिळविणे ही मानवाची प्राचीन काळापासूनची आकांक्षा राहिली आहे. गेल्या काही दशकांमध्ये प्रगत, उत्तम वैद्यकीय साधन सामग्री आणि आधुनिक उपचार पद्धतींमुळे जगभर माणसांचे सरासरी आयुष्य वाढले आहे. संशोधकांच्या मतानुसार, औषधोपचार आणि तंत्रज्ञानाखेरीज शस्त्रक्रिया व अवयव प्रत्यारोपणही यात मदत करतात. त्यामध्ये वृद्धत्वाच्या प्रक्रियेत बदल घडविण्याचीही क्षमता आहे. अलीकडेच चीन आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये माणूस दीडशे वर्षे जिवंत राहू शकतो, यासंदर्भातील संवाद उघड झाल्याने त्यावर नवी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात वृद्धत्व थांबविण्यासाठी संशोधन जगभरात निरंतर सुरू आहे. काही प्रयोगांमध्ये उपवासाचेही सकारात्मक निष्कर्ष दिसून आले आहेत.
अमेरिकेतील भविष्यवेत्ता व संशोधक रे कुर्जिवल हे रोज मोठय़ा प्रमाणावर गोळ्या घेतात. ‘टाईम’ आणि ‘पर्ह्ब्स’ या मासिकांतील मुलाखतींनुसार, काही वर्षांपूर्वी ते दररोज दोनशे ते अडीचशे अन्न पूरक गोळ्या घेत असत. अलीकडील काळात ही संख्या घटून सुमारे ऐंशी ते शंभरवर आली आहे. त्यामध्ये विविध अन्न पूरक, जीवनसत्त्वे, खनिजे, वृद्धत्व रोखणारी औषधे आणि दीर्घायुष्य साधणारी औषधे यांचा समावेश असतो. त्यांना कोणताही जीवघेणा आजार नाही. मात्र दीर्घायुष्याबाबत त्यांच्या प्रयोगांचा आणि विश्वासाचा तो एक भाग आहे. कुर्जविल ज्या प्रकारच्या भविष्यातील कल्पना करतात आणि त्या साकार करण्यासाठी इतक्या गोळ्या खातात, त्याचेच उदाहरण अलीकडे बीजिंगमधील लष्करी संचलनावेळी दिसले. त्या वेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात झालेल्या संभाषणाचा एक भाग समोर आला. त्या संवादात मानवी अवयवांचे पुन्हा पुन्हा प्रत्यारोपण करून माणसाला वृद्धत्व टाळता येईल आणि कदाचित अमर्याद काळासाठी वार्धक्य दूर ठेवता येईल, असे पुतिन जिनपिंग यांना सांगत होते. त्यांनी हेही सुचवले की, या शतकातच माणूस दीडशे वर्षे जगण्यास सक्षम होऊ शकेल. हे संभाषण केवळ विनोदाचा भाग होता का? की या नेत्यांनी स्वतःला जवळपास अमर ठेवण्याच्या शक्यता शोधल्या, हे सांगणे कठीण आहे, पण हे दोघेही राष्ट्राध्यक्ष असल्याने ही चर्चा काही प्रमाणात खरी वाटते. दोन्ही नेते स्वतःला वृद्ध होण्यापासून वाचवून दीर्घकाळ सत्तेत टिकवण्याचा विचार करत असावेत. मात्र सामान्य माणसालाही किमान दीडशे-दोनशे वर्षे जिवंत ठेवता येईल का?
डिसेंबर 2015 मध्ये दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात ख्यातनाम संशोधक डॉ. ऑब्रे डी ग्रे (सेन्स रिसर्च फाऊंडेशनचे मुख्य विज्ञान अधिकारी) यांनी पुढील पंधरा वर्षांत प्रत्येक माणूस किमान 100 वर्षे जिवंत राहू शकेल, असा अंदाज वर्तविला होता. वृद्धत्व थांबविणाऱ्या औषधांच्या संशोधनावर काम करणारे डॉ. ग्रे यांच्या मतानुसार, शरीरातील पेशींचा ऱहास थांबवून व शरीरातील अणुकणांच्या प्रक्रियेला उलटवून वृद्धत्व रोखता येईल. विज्ञान आता या टप्प्याजवळ पोहोचले असल्याने 100 वर्षांचे आयुष्य ही सामान्य गोष्ट होऊ शकते. येथे मुख्य भर हा फक्त आयुष्य वाढविण्यावर नाही, तर वृद्धत्व थांबविण्यावर आहे.
विज्ञानाच्या नजरेत वृद्धत्व
विज्ञानाच्या दृष्टीने वृद्धत्व ही अशी प्रक्रिया आहे, जिचा अनुभव पृथ्वीवरील प्रत्येक जिवाला घ्यावा लागतो. वनस्पती व प्राणी यांच्यात वाढत्या वयाची लक्षणे स्पष्ट दिसतात. चेहऱ्यावर सुरकुत्या, शरीर वाकणे, हाडे कमकुवत होणे, डोळे-कान यांसह सर्व ज्ञानेंद्रियांचा ऱहास ही वृद्धत्वाची चिन्हे आहेत. मात्र संशोधकांच्या मतानुसार वृद्धत्व हे पेशींच्या विभाजनाच्या दरावर अवलंबून असते. मानवी पेशी मृत्यूपूर्वी सरासरी जास्तीत जास्त पन्नास वेळा विभाजित होतात. जितक्या वेळा पेशी विभाजित होतात तितक्या वेळा मानवी क्षमतांमध्ये घट होत जाते. वृद्धत्वाचे आणखी एक कारण टेलोमिअर नावाच्या एन्झाईमची लांबी कमी होणे मानले जाते. तरुण अवस्थेत टेलोमिअर विपुल प्रमाणात तयार होतात. त्या डीएनए पेशींचे रक्षण करतात. डीएनएच्या दोन्ही टोकांना असणारी ही झाकणासारखी रचना म्हणजे टेलोमिअर होय. त्यांची लांबी वयानुसार कमी होत जाते. शरीर वृद्ध होण्यामागील सर्व कारणांमध्ये टेलोमिअर लहान होण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते.
मागील पन्नास-साठ वर्षांत जगभर सरासरी आयुष्यात भर पडली आहे. उदाहरणार्थ, 1970 मध्ये जन्मलेल्या अमेरिकन नागरिकांचे सरासरी आयुष्य 70.8 वर्षे मानले जात होते. ते 2000 साली 77 वर्षांपर्यंत पोहोचले. 2002 मध्ये प्रौढ अमेरिकन नागरिकांचे सरासरी आयुष्य 75 वर्षे होते, तर पुढे त्यात आणखी 11.5 वर्षांची वाढ अपेक्षित आहे.
दीर्घायुष्याच्या संशोधनात कार्यरत शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, नियंत्रित उपवास केल्यास केवळ वजन घटत नाही, तर आरोग्यासंबंधी अनेक फायदेही मिळतात. विशेषतः आयुष्य वाढविणे शक्य होते. 1930 पासूनच कमी पॅलरीवर जगणाऱ्या उंदरांचे आयुष्य पौष्टिक आहार घेणाऱ्या उंदरांपेक्षा जास्त असल्याचे प्रयोग सांगतात. आजही अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध होत आहे. लंडनमधील इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ एजिंग येथे आनुवंशिक आणि जीवनशैलीसंबंधी घटकांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनाही असेच निष्कर्ष मिळाले आहेत. संशोधन पथकातील डॉ. मॅथ्यू पायपर यांच्या मते, आहारावर नियंत्रण ठेवणे हे आयुष्य वाढविण्याचे प्रभावी साधन आहे. त्यांच्या मतानुसार, जर उंदराच्या आहारात 40 टक्क्यांची कपात केली तर त्याचे आयुष्य 20 ते 30 टक्क्यांनी वाढते. त्यांच्या सारखेच मत मांडणारे इतरही संशोधक सांगतात की, आहारावर नियंत्रण ठेवून माणसाचेही आयुष्य वाढवता येते.
विज्ञान वृद्धत्वाला अनियंत्रित आणि विस्कळीत प्रक्रिया मानत नाही. नव्या व्याख्येनुसार, वृद्धत्व ही नियंत्रित करता येणारी प्रक्रिया आहे आणि त्यात बदल शक्य आहेत. फक्त एवढाच फरक आहे की, हे बदल घडविण्याचे मार्ग आपल्याला अद्याप स्पष्टपणे माहीत नाहीत. ज्या दिवशी हे गूढ उलगडेल, त्या दिवशी अमरत्व किंवा किमान 120 ते 150 वर्षांचे आयुष्य ही फार मोठी गोष्ट राहणार नाही. अर्थात माणसांना एवढे आयुष्य जगायची इच्छा असेल तरच.
अलीकडील आकडेवारी व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालांनुसार, विसाव्या शतकाच्या अखेरीच्या दशकांच्या तुलनेत आता वृद्धांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. 2024 मध्ये जगभरात सुमारे 7.22 लाख लोक शंभर किंवा त्याहून अधिक वयाचे होते हे 2015 च्या 4.5 लाखांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. अंदाज आहे की, 2050 पर्यंत ही संख्या जवळपास आठपट वाढून 37 लाखांवर जाईल आणि शतकाच्या अखेरीस ती 1.79 कोटींवर पोहोचेल, पण त्यामुळे मानवी समाजासमोर एक नवे सामाजिक-आर्थिक आव्हान उभे आहे, ते म्हणजे जगभरातील वृद्धांना समावेशक व सन्मानजनक जीवन कसे मिळवून द्यावे? पुढील दशकांत जगाच्या लोकसंख्येत वृद्धांचा मोठा हिस्सा असेल. त्यामुळे शासन, समाज आणि आरोग्य व्यवस्था सर्वांनीच तयारीत राहणे आवश्यक आहे.
(लेखक माध्यम तज्ञ आहेत)