आर.टी.ओ. कर्मचारी संघर्षाच्या पवित्र्यात; सरकारच्या विरोधात नाराजी

पदोन्नती, आकृतीबंध आणि इतर मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे 27 ऑक्टोबर 2025ला मोटार वाहन कर्मचारी संघटनेच्यावतीने मुंबईतील परिवहन विभागाच्या मुख्यालयाच्याबाहेर बेमुदत साखळी उपोषणास पुकारण्यात येणार आहे आणि तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास  बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.

कर्मचा-यांच्या पदोन्नतीच्या मागण्यांसाठी मोटर वाहन विभाग(आरटीओ) संघटनेच्यावतीने सलग सहा वर्षे संघर्ष करण्यात आला, त्यानंतर  सप्टेंबर 2022मध्ये नवीन आकृतीबंधास शासन मान्यता मिळाली. आकृतीबंधाचे आदेश जारी होऊनही दोन वर्षात कर्मचारी वर्गास आकृतीबंधाचा फायदा देण्यात आलेला नाही. परिणामी कर्मचायांना पदोन्नती पासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी केला. वर्षभराचा कालावधी लोटूनही एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही  आरटीओ प्रशासनाचा कर्मचाऱ्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कमालीचा उदासीन आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला अलिकडे दिलेली आश्वासने सुध्दा पाळली जात नसल्याने परिवहन विभागात कर्मचायांच्या भावनांचा उद्रेक झालेला आहे. त्यामुळे आंदोलन पुकारण्यात येणार आहे.