
धारावी पुनर्विकास प्रकल्प उद्योगपती अदानींच्या माध्यमातून राबवून सामान्य धारावीकरांची फसवणूक होत आहे. धारावीकरांच्या मागण्यांकडे सरकार आणि अदानींकडून पूर्णपणे दुर्लक्ष होऊन मनमानीच केली जात आहे. त्यामुळे धारावीकरांना आपल्या भवितव्याबद्दल संभ्रम आहे. आपल्याला बेघर केले जाईल अशी भीती त्यांना सतावत आहे. दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारावीलाही भेट द्यावी आणि धारावीतील झोपडपट्टीवासीयांच्या या वेदना जाणून घ्याव्यात, अशी कळकळीची विनंती धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.
धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना ई-मेल पाठवण्यात आला आहे. पंतप्रधानांनी धारावीचाही दौरा करा अशी विनंती त्यात करण्यात आली असल्याचे आंदोलनाचे नेते, माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले. धारावीच्या विकासाला धारावी बचाव आंदोलन या संघटनेचा विरोध नाही. पण सध्या जो एकतर्फीपणे धारावीचा विकास चालू आहे त्याला आमचा विरोध आहे, असे त्या ई-मेलमध्ये अधोरेखित करण्यात आल्याचे माने यांनी सांगितले.
सर्व पात्र-अपात्र लोकांना धारावीतच 500 चौ.फु.ची घरे, दुकाने-गाळे द्या, धारावीतील पाच हजार लघुउद्योगांसाठी लघुउद्योग पार्क उभे करा, पुंभार, कोळी बांधवांना व्यवसायाप्रमाणे जागा द्या अशा धारावी बचाव आंदोलन या संघटनेच्या मागण्या आहेत याकडेही मेलमध्ये पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. या मागण्या राज्य शासन आणि अदानी कंपनीने अजून मंजूर केलेल्या नाहीत. या मागण्यांबाबत मोदी यांनी आमच्या धारावी बचाव आंदोलन संघटनेशी चर्चा करावी अशीही मागणी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.
nजेथे झोपडपट्टी तेथेच त्या झोपडपट्टीचा विकास असे राज्य शासनाचे वर्षांनुवर्षाचे धोरण आहे. अदानी कंपनीने धारावीतच धारावीचा विकास करावा. धारावीतच झोपडपट्टीवासीयांना घरे बांधून द्यावीत असे धोरण असतानाही अदानी कंपनीस मुलुंड डम्पिंग ग्राऊंड, देवनार डम्पिंग ग्राऊंड व कुर्ला मदर डेअरी आदी ठिकाणची सुमारे 900 एकर जागा कशासाठी दिल्या, असा सवाल माने यांनी केला आहे.