
अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाडय़ातील उद्ध्वस्त झालेल्या गावांसाठी शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱयांसाठी मदतीचा ट्रक आज ‘मातोश्री’ येथून रवाना झाला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या पुढाकाराने त्यांच्या अध्यक्षतेखालील महानगर टेलिपह्न निगम कामगार संघ, स्थानीय लोकाधिकार समिती यांचेही या उपक्रमाला बहुमोल सहकार्य लाभले आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱयांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेने ‘जाणीव’ न्यासाच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. मराठवाडा जिल्हा धाराशीवमधील सर्वाधिक हानी झालेल्या बेलगाव, लाकी, इडा या गावांतील आपद्ग्रस्त कुटुंबीयांना देण्यासाठीच्या सदर किट्स शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. या वेळी ‘जाणीव’ ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, स्वीय सचिव रवी म्हात्रे, ‘जाणीव’ ट्रस्टचे दिलीप जाधव, प्रकाश शिरवाडकर, बाळा साटम, संजय ढोलम, प्रदीप परब, दत्ता भोसले, महेश धुरी, मधुकर घाडी, शरद गीते, संजय भांबुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
23 किलोचे किट, 23 टन वस्तूंचे वाटप
जाणीव ट्रस्टच्या सौजन्याने मराठवाडय़ातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू तसेच दिवाळी फराळ जिन्नस यांचे एकत्रित 23 किलोचे किट देण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 23 टन वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ, कडधान्ये, रवा, तेल, तूप, साखर, मैदा, बेसन, शेंगदाणे, पोहे, मसाले, मिठापासून आंघोळीच्या साबणापर्यंत सर्व जिन्नस समाविष्ट करण्यात आले आहेत.






























































