50 हजार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, ऑगस्टपासून वेतन रखडले; मानधन वाढीतही ‘परफॉर्मन्स’ची जाचक अट

राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱया सुमारे 50 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्यांना ऑगस्टपासूनचे वेतन देण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे तर सरकारने त्यांच्या मानधनात वाढ केली, पण त्यासाठी ‘परफॉर्मन्स रिपोर्ट’ची जाचक अट टाकली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी आहे.

आधीच या कर्मचाऱ्यांचे वेतन तुटपुंजे आहे. ते मानधन स्वरूपात दिले जाते. मात्र ऑक्टोबरचा दुसरा आठवडा येऊनही त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना घर चालवणेही कठीण होऊन बसले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 15 टक्के इतकी भरघोस मानधन वाढ करण्यास महायुती सरकारने मान्यता दिली, परंतु ती मानधनवाढ देताना ‘परफॉर्मन्स रिपोर्ट’ सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. 5 टक्के मानधनवाढ सरसकट लागू केली जाणार आहे तर उर्वरित 10 टक्के वाढ ही कर्मचाऱ्यांच्या ‘परफॉर्मन्स रिपोर्ट’वर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आधीच वेतन रखडल्याने हैराण झालेले हे कर्मचारी आणखीच टेन्शनमध्ये आले आहेत.

दोन महिन्यांच्या थकबाकीसह ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी द्या

मागील दोन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी चालू ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या वतीने शिवसेनेच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळाले नाही तर प्रशासनाविरुद्ध कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.