
सोने आणि चांदीचे दर दररोज नवनवीन विक्रम मोडीत काढत असताना दिसत आहे. सोन्याच्या दरवाढीचा ट्रेंड कायम राहिल्याने जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये वाढ नोंदवली गेली. सोबतच चांदीदेखील महागली आहे. आजच्या दरवाढीनंतर 24 कॅरेट ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 27 हजारापर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर चांदी जीएसटीसह 1 लाख 68 हजार रुपयांवर पोहचली आहे.
दिवाळीला ग्राहक सोने खरेदी करतात. मात्र वाढत्या सोन्याच्या दरामुळे सोने खरेदी करावं की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. जळगाव शहरातील सुवर्णपेठेत सोने दरात वाढ झालीय. जळगाव सराफ बाजारात आज गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 1 लाख 23 हजार 400 ते जीएसटीसह 1 लाख 27 हजार 400 रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदी दरातही दरवाढ आहे. चांदीचा एक किलोचा दर 1 लाख 68 हजार रुपयांवर पोहोचला आहे.
सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने विशेषतŠ धनतेरस आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा काही घटक सोन्याच्या उच्चांकी दरवाढीला कारणीभूत ठरले आहेत. अमेरिकन सरकारच्या शटडाऊनची शक्यता आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांमध्ये कपात होण्याच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्याकडे वाढणार असल्याचे भंगाळे गोल्डचे संचालक आकाश भंगाळे यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.