अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मनाई, काँग्रेसची टीका

दिल्लीमध्ये शुक्रवारी अफगाण परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी यांची केलेल्या पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत महिला पत्रकारांना सहभागी होऊ दिले नव्हते. यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पण या कार्यक्रमात सरकारचा काहीच हस्तक्षेप नव्हता असे सरकारने स्पष्ट केले.

आज तकने याबाबतीत वृत्त दिले आहे की, सरकारी सूत्रांनी सांगितले, “दिल्लीमध्ये काल अफगाण परराष्ट्रमंत्री यांच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाची कोणतीही भूमिका नव्हती.” मुत्तकी यांच्या पत्रकार परिषदेत एकही महिला पत्रकार उपस्थित नव्हती, ज्यामुळे महिलांवरील तालिबानच्या भेदभावपूर्ण वागणुकीवर तीव्र टीका झाली. छायाचित्रांमध्ये दिसून आले की ही पत्रकार परिषद फक्त पुरुष पत्रकारांसाठीच आयोजित करण्यात आली होती.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत ‘एक्स’वर लिहिले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, कृपया स्पष्ट करा की तालिबानच्या प्रतिनिधीच्या भारत दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना बाहेर का ठेवण्यात आले? फक्त निवडणुकीच्या वेळी महिलांचा सन्मान करायचा नसतो. आपल्या देशात महिलांचा असा अपमान झालाच कसा? असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींच्या या पोस्टला शेअर करत लिहिले, “मोदीजी, जेव्हा आपण एखाद्या सार्वजनिक मंचावर महिला पत्रकारांना बाहेर ठेवण्यास परवानगी देता, तेव्हा आपण भारतातील प्रत्येक महिलेला सांगत आहात की आपण त्यांच्या बाजूने उभे राहण्यास कमकुवत आहात. आपल्या देशातील महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान सहभागाचा अधिकार आहे. अशा भेदभावपूर्ण प्रसंगी आपले मौन ‘नारी शक्ति’च्या आपल्या घोषणांच्या पोकळपणाचे दर्शन घडवते अशी टीका राहुल गांधी यांनी केली.