
>> प्रमोद जाधव
आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्याने सुकामेव्याला स्थिर आणि टिकाऊ मागणी मिळत आहे. यंदाच्या दिवाळीत गोडधोडाबरोबरच सुकामेव्यालादेखील मोठी मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेतील आणि परदेशातून आयात होणाऱ्या सुकामेव्यावरील वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत घटवल्याने दरात तब्बल 7 टक्क्यांची बचत होत आहे. त्यामुळे सुकामेवा काहीसा स्वस्त झाला असून, बाजारात खरेदीचा उत्साह वाढला आहे.
जीएसटी कपातीमुळे सुकामेवा बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी एक हजार रुपयांच्या खरेदीवर 120 रुपये जीएसटी भरावा लागत होता; आता तो केवळ 50 रुपयांवर आला आहे. परिणामी, ग्राहकांना प्रत्यक्ष बचत जाणवू लागली आहे. पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्ड गुळ-भुसार घाऊक बाजारातील सुकामेव्याचे दर मागील वर्षाच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी घटले आहेत. विशेषतः बदाम, पिस्ता, अंजीर, खजूर आणि खारीक या वस्तूंमध्ये दर कमी झाल्याने ग्राहक आनंदी आहेत. जीएसटी कपातीचा थेट परिणाम दिवाळीतील विक्रीवर होणार असून, सुकामेव्याची उलाढाल 20 ते 25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. बाजारात नवीन पॅकेजिंग, गिफ्ट हॅम्पर्सच्या माध्यमातूनही व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठ
हिंदुस्थान हा जगातील प्रमुख सुकामेवा उत्पादक देश आहे. काजू, बेदाणा, अक्रोड, चारोळी आणि काळा मनुका देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामीळनाडू ही प्रमुख उत्पादक राज्ये आहेत. अफगाणिस्तान, इराण, अमेरिका आणि मध्यपूर्व देशांमधूनही सुकामेव्याची आयात होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य स्थिर राहिल्याने आयात खर्चात वाढ झालेली नाही, त्यामुळे दर स्थिर आहेत.
आरोग्य व जीवनशैलीचा ट्रेंड
कोरोनानंतर आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्याने सुकामेव्याला स्थिर आणि टिकाऊ मागणी मिळत आहे. फिटनेस ट्रेंडमुळे तरुण ग्राहकवर्ग प्रथिनेयुक्त आणि नैसर्गिक खाद्यपदार्थांकडे वळला आहे. त्यामुळे सुकामेवा दैनंदिन आहाराचा भाग बनला आहे.
– जीएसटी दर कमी झाल्याने ग्राहकांना थेट दिलासा मिळाला आहे. सुकामेवा आता अधिक परवडणारा झाला आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांचे पगार, बोनसदेखील झाले असून, किरकोळ बाजारात उलाढाल वाढण्यास सुरुवात होईल. यंदा जीएसटीमधील सवलतीमुळे उलाढाल 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
नवीन गोयल, उपाध्यक्ष, ड्रायफ्रूट असोसिएशन, मार्केटयार्ड.
दिवाळीचा आर्थिक परिणाम
सामान्यपणे सणासुदीच्या काळात सुकामेव्याची उलाढाल देशभरात 8,000 ते 10,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. यंदा जीएसटी सवलतीमुळे ही उलाढाल 12,000 कोटींच्या आसपास जाण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.