’फेक न्यूज’ ही सध्याच्या हिंदुस्थानची खासियत, मोहम्मद युनूस यांची टीका

बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार होत असल्याचा आरोप तेथील हंगामी सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी फेटाळून लावला. ‘हा हिंदुस्थानकडून होणारा अपप्रचार आहे. ’फेक न्यूज’ ही सध्याच्या हिंदुस्थानची खासियत झाली आहे,’ अशी टीका युनूस यांनी केली.

एका मुलाखतीत ते बोलत होते. शेजाऱ्यांमध्ये किंवा जमिनीवरून स्थानिक पातळीवर काही वादाच्या घटना घडल्या तरी त्याला धार्मिक हल्ल्याचे लेबल लावले जाते. प्रत्यक्षात तसे नाही. हा हिंदुस्थानचा अपप्रचार आहे. त्यांच्याकडून फेक न्यूजचा भडिमार होत आहे. बांगलादेशवर दबाव आणण्यासाठी हिंदुस्थानकडून याचा वापर केला जातो. त्यामुळे आम्ही खूप सावध आहोत, असे युनूस म्हणाले.

शेख हसीना परत येतील?

हिंदुस्थान सरकार शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करेल असे वाटत नाही. पंतप्रधान मोदींच्या भेटीतही मी त्याबाबत कुठलाही आग्रह केलेला नाही. हसीना यांनी बांगलादेशातील सरकार व जनतेविषयी काही बोलू नये याची काळजी घ्यावी, इतकीच अपेक्षा मी त्यांच्याकडे व्यक्त केली. सोशल मीडियाला मी नियंत्रित करू शकत नाही, असे उत्तर मोदींनी यावर दिल्याचे ते म्हणाले.

स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ नका!

’मी हिंदू आहे, माझं संरक्षण करा असे बांगलादेशातील हिंदूंनी म्हणू नये. मी बांगलादेशी आहे. या देशाचा नागरिक आहे. मला संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे अशी भूमिका घ्यावी. त्यातून सामाजिक सौहार्द वाढेल आणि सर्वांना समान संरक्षण मिळेल. बांगलादेशातील हिंदूंनी स्वतःला एकाकी समजू नये. देशाचे नागरिक म्हणून त्यांनी हक्काने मागण्या कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.