त्वचेला बसू शकतो फटाक्यांचा फटका, आरोग्य तज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

फटाक्यांची आतषबाजी दिवाळीचा आनंद द्विगुणित करते. त्यामुळे दिवाळीत आतषबाजी करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत चढाओढ लागलेली असते. मात्र हा आनंद साजरा करताना जपून! कारण, वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्यांमुळे व त्यातील दारूमुळे आपल्या त्वचेला मोठा फटका बसू शकतो. अगदी जिवावरही बेतू शकते. त्यामुळेच दिवाळीच्या दिवसात आरोग्याची, खासकरून त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिला आहे.

फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे केवळ आवाजाचे नसते. ते अनेक प्रकारचे असते. त्यातून हवेची गुणवत्ता खालावते. अगदी फटाके चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचीही शक्यता असते. सुप्रसिद्ध त्वचाविकार तज्ञ डॉ. हृषिकेश मुंडे यांनी फटाक्यांचे धोके सांगतानाच खबरदारीच्या काही सूचनाही केल्या आहेत.

काय आहेत धोके?

फटाक्यांचा पहिला संबंध ते हाताळणाऱ्याच्या हाताशी येतो. त्यानंतर डोळ्यांशी व चेहयाशी येतो. त्यामुळे नीट काळजी घ्यायला हवी. फटाक्याच्या दारूपासून रेडिएशन होते. त्यामुळे चेहरा करपटणे, चेहऱ्यावर काजळी चढणे, चेहरा ठराविक ठिकाणी काळा पडणे असे आजार होऊ शकतात. फटाक्याच्या उष्णतेमुळे त्वचा खराबही होऊ शकते. त्वचा कोरडी पडू शकते. निद्रानाशासारखे त्रासही होऊ शकतात. फटाक्यातील दारू विषारी असते. ती नाकावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसाचे आजारही होऊ शकतात.

काय काळजी घ्याल!

सर्वात महत्त्वाचे म्हणजे चेहरा व डोळ्याचे अंतर फटाक्यापासून शक्य तितक्या लांब राहील हे पाहा. दिवाळीच्या काळात चेहऱ्याला सनस्क्रीन लावा. फटाका हातात फुटल्यास हात जळू शकतो. कधी-कधी कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे फटाका खाली ठेवून मगच तो पेटवा. फटाके हाताळून झाल्यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुवा. हात धुताना साबणाचा किंवा हँडवॉशचा वापर करा. फटाके वाजवताना सनग्लासेसचा किंवा साध्या चष्म्यांचा वापर करा. जेणेकरून डोळे सुरक्षित राहतील.

फटाके वाजवताना काही इजा झालीच तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्या. प्राथमिक उपचार म्हणून भाजलेल्या जागी बर्नाल लावता येईल. मात्र, भाजलेल्या जागी शाई, पेस्ट किंवा चुना लावू नका. वनस्पती लेप किंवा इतर गावठी उपचार करत बसू नका. डोळ्यांना काही त्रास होत असल्यास डोळे थंड पाण्याने धुवून डॉक्टरांकडे जा, असे डॉ. ऋषिकेश मुंडे यांनी सांगितले.