धनत्रयोदशीपर्यंत सोने 1.30 लाखांवर जाणार, पुढच्या वर्षी दीड लाखाच्या पार

सोन्याच्या किंमतींमध्ये सुरू असलेली तेजी थांबण्याचे नाव घेत नाहीये. या वर्षात सोन्याचे दर आतापर्यंत जवळपास 50 टक्क्यांनी वाढले आहेत. तर, मागील तीन वर्षांत सोन्याच्या दरांमध्ये 140 टक्क्यांची जोरदार वाढ झाली आहे. दिवाळीत सोन्याला आणखी झळाळी मिळणार आहे. धनत्रयोदशीपर्यंत सोने 1.30 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर सोने पुढच्या वर्षी दीड लाखाच्या पार जाईल, असाही अंदाज आहे.

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी कायम आहे आणि या धनत्रयोदशीला सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचू शकतात. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजमध्ये कमोडिटी रिसर्चच्या प्रमुख वंदना भारती यांनी सांगितले की, सेंट्रल बँक आणि ईटीएफकडून होणाऱ्या मजबूत खरेदीमुळे किंमतींमध्ये वाढ दिसून येईल.’ या धनत्रयोदशीला सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 20 हजार रुपये ते 1 लाख 30 हजार रुपये दरम्यान राहू शकतात. त्यांनी सांगितलंय की, 2026 च्या सुरुवातीला सोन्याचे दर 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

ईटीएफमध्ये 902 दशलक्ष डॉलरचा इनफ्लो

वर्ल्ड गोल्ड काऊंसिलनुसार सप्टेंबर 2025 मध्ये इंडियन गोल्ड ईएफटीमध्ये 9020 लाख डॉलरचा इनफ्लो झाला. ऑगस्टच्या तुलनेत यात 285 टक्क्यांची वाढ दिसून आली. अमेरिका, यूके आणि स्वित्झर्लंडनंतर हिंदुस्थान जगभरात चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. 17.3 अब्ज डॉलरच्या जागतिक इनफ्लोमध्ये हिंदुस्थानचे मोठे योगदान आहे.

एमसीएक्सवर 1,22,284 रुपयांपर्यंत

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स ) सोन्याचे दर या आठवड्यात आधीच 1,22,284 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत, जे जागतिक आणि देशांतर्गत घटकांच्या मिश्रणाचे संकेत देतात. याव्यतिरिक्त, जगभरातील सेंट्रल बँका सोने खरेदी करण्यात गुंतलेल्या आहेत. एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्येही चांगला इनफ्लो दिसून येत आहे. सोन्याला सुरक्षित माध्यम म्हणून गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.