गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर आता पाऊस दीपोत्सव साजरा करणार!

यावर्षी कधी नव्हे एवढा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पहायला मिळाला आहे. मे महिन्यात काही धरणांत पाणी आल्यानंतर जून ते सप्टेंबर धोधो पाण्याचा साठा झाला. गणेशोत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आता दीपोत्सव म्हणजे दिवाळी सण पाऊस साजरा करणार आहे. नव्या माहितीनुसार, हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. 14 ऑक्टोबरपासून 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह वादळी पाऊस अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काढणी केलेल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. या दरम्यान अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

15 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. 16 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 17 ऑक्टोबर रोजी विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.