महाभारतातील ‘कर्ण’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन

मनोरंजन सृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी साडेअकरा वाजता त्यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. त्यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज यांना कर्करोग होता, त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली होती. मात्र मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरचे निदान झाले. त्यांची अवस्था फार नाजूक होती. या आजारामुळे त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र त्यांना वाचवता आले नाही. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

पंकज यांनी टिव्ही इंडस्ट्रीत एकापेक्षा एक सरस प्रोजक्ट केले आहेत. मात्र बी.आऱ चोपडा यांची ‘महाभारत’ मालिका त्यांच्यासाठी टर्निंग पॉईण्ट ठरली होती. या मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका ज्या पद्धतीने वठवली होती, ती आजही प्रेक्षकांच्या चिरस्मरणात आहे.