
रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या मालिकेचा तपास पोलीसांना अद्याप लागलेला नसतानाच, चोरट्यांनी पुन्हा एकदा ग्रामीण भागातील बंद घरांकडे मोर्चा वळवला आहे. नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार धनगरवाडी आणि कुंभवडे हरचेलीवाडी येथे सोमवारी (१३ ऑक्टोबर) रात्री ते मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सकाळपर्यंत पाच घरे फोडण्यात आली.
या घरफोड्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम ४० हजार आणि सुमारे १० हजार किमतीची दुचाकी असा मिळून ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सुहास भगवान मणचेकर (रा. कुंभवडे हरचेलीवाडी) यांनी नाटे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक चौकशीत चोरट्यांनी बंद घरांच्या कुलपांवर दगड टाकून ती फोडल्याचे उघड झाले आहे.
नाटे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून श्वानपथकाच्या मदतीने माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. यापूर्वी याच परिसरातील नाणार-पाळेकरवाडी येथे सुरेश म. प्रभू यांच्या बंद घरातून स्मार्ट टीव्हीसह सुमारे ११ हजारांचा माल चोरीला गेला होता. त्या घटनेचा तपासही प्रलंबित आहे. दोन दिवसांच्या फरकाने पुन्हा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. याचप्रमाणे, कोंडये गावातील पाच घरफोड्या आणि राजापूर शहरातील तीन दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा तपासही अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे राजापूर पोलीस दलासमोर आव्हान निर्माण झाले आहे.