
बोगस मतदारांना बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच 1 नोव्हेंबर शनिवारी निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघणार अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.
आज शिवसेना भवनमध्ये सर्वपक्षीय पत्रकार परिषद झाली. यावेळी संजय राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्ंयाबाबत महाराष्ट्राचे सर्व प्रमुख पक्ष एक लढाई लढत आहेत. ही लढाई राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आम्ही दिल्लीत लढत आहोत. त्यानंतर महाराष्ट्रात ही लढाई सुरू झाली आहे. त्यातून काय निष्पण्ण होईल त्याबाबत शंका आहे. आज मनसेचा फार मोठा मेळावा गोरेगावमध्ये पार पडला. तिथे राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की मतदान करा किंवा करू नका निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झालेले आहे. आणि या मॅच फिक्सिंगविरोधातच आपली लढाई आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीत आजही 96 लाख बोगस मतदार आहेत. म्हणजे जवळजळ एक कोटी. हे एक कोटी मतदार आमच्यासाठी घुसखोर आहेत. आणि या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणं हे लोकशाहीची गरज आहे. हे मी यासाठी सांगत आहे कालच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात सांगितले की आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांनी नावं मतदारयादीतून बाहेर काढू. हे देशाच्या गृहमंत्र्यांचे विधान आहे आणि निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख हे गृहमंत्री असतात. आमचे त्यांना आव्हान आहे, की महाराष्ट्राच्या मतदारयादीत घुसलेले एक कोटी मतदारांना तुम्ही बाहेर काढा आणि या मोहीमेला महाराष्ट्रापासून सुरूवात करा असेह संजय राऊत म्हणाले.
तसेच काही उदाहरणं मी राज ठाकरे यांच्या मेळाव्यात ऐकली. पण सर्वात मोठे उदाहरण आहे पैठणचे आमदार विलास भुमरे यांचं. जाहीर व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघातून 20 हजार मतदार मी बाहेरून आणले. त्यांना मतदार केलं आणि मी जिंकू शकलो. यापेक्षा आणखी काय हवंय एक आमदार सांगतोय. दुसरं म्हणजे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की या पूर्वी मी लढवलेल्या निवडणुकांमध्ये दुबार आणि बोगस मतदारांची यादी मी दिली होती, मात्र ती नावं कधीच कमी झाली नाहीत. अनेक ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी बोगस मतदारांची नोंदणी करत होते. हे सत्ताधारी पक्षाच्या आमदार सांगत आहेत. नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघात 41 हजार आणि बेलापूर मतदारसंघात 35 हजार दुबार आणि बोगस मतदार आहेत, हे सत्ताधारी पक्षाच्या आमदार सांगत आहेत. बुलढाण्यातले सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे की बुलढाण्यात एक लाखापेक्षा जास्त बोगस मतदार नोंदवले आहेत. याचा अर्थ लोकसभेत त्यांचा जो खासदार जिंकला हा बोगस मतदारांच्या मदतीने जिंकला आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीत घोटाळ करून हे लोक सत्तेवर येत आहेत. मतदार यादी शुद्ध आणि पवित्र असायला हव्यात त्यासाठी हा संघर्ष आहे. निवडणुका पारदर्शक असलायला हव्यात यासाठी महाराष्ट्रातले सर्व पक्ष सत्ताधारी वगळून लढत आहेत. दोन दिवस निवडणूक आयोगाकडे बैठका झाला, त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शशिकांत शिंदे कॉ. प्रकाश रेड्डी होते. आम्ही ज्या भूमिका मांडल्या त्या ते मान्य करायला तयार नाहीत. आणि आमच्या याद्या निर्दोषच आहेत असे ते म्हणताहेत. खरं म्हणजे निवडणूक आयोगाने गुन्हेगारी स्वरुपाचं कृत्य केलं आहे. यांना दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल. 1 नोव्हेंबर शनिवारी निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल, महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोकं इथे येतील आणि मतदारांची ताकद देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्याना आणि निवडणूक आयोगाला दाखवून देईल. या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाविकास आघाडीचे नेते करतील. तर हा जो दणका आहे निवडणूक आयोगाला देणे गरजेचा आहे की महाराष्ट्र अजगराप्रमाणे सुस्त पडलेला नाही. अशा प्रकारचा मोर्चा आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत काढला होता. तेव्हासुद्धा सर्व पक्षाचे प्रमुख नेते रस्त्यावर उतरले होते. त्यात शरद पवारही होते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात मोर्चा निघेल. देशातला आणि राज्यातला निवडणूक आयोग हा सरकारचा आणि भाजपचा गुलाम आहे. त्यांच्याकडून फार अपेक्षा करता येत नसल्या तरीसुद्धा विरोधी पक्षांनी ज्यांच्यावर या देशाच्या लोकशाहीची मोठी जबाबदारी आहे, त्यांना स्वस्थ बसता येत नाही. त्यांनी लोकशाहीच्या बचावासाठी संघर्ष हा करायलाच पाहिजे. आणि आम्ही तो करतोय दिल्लीमध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीने लढा देत आहेत त्या पद्धतीने राज्या राज्यामध्ये त्या त्या विरोधी पक्षनेत्यांनी हा लढा पुढे नेला पाहिजे. आणि मला खात्री आहे या लढ्याला पुढे यश नक्की मिळणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.