
यंदाच्या दिवाळीत ठाकरे कुटुंबात नात्यांचा गोडवा द्विगुणित झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज भाऊबीजेनिमित्त सहकुटुंब सहपरिवार पुन्हा एकत्र आले. राज ठाकरे यांच्या सख्ख्या भगिनी जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या दादर येथील निवासस्थानी संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांनी मोठय़ा आनंदात भाऊबीज साजरी केली.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर गणेशोत्सवाला उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटनही यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी दोन्ही कुटुंबीय एकत्र आले होते. कालच राज ठाकरे यांच्या आई अर्थात मावशी कुंदाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आज ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र पार पडली. जयजयवंती यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे औक्षण केले तर राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांनी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे, यश देशपांडे यांना ओवाळून भाऊबीज साजरी केली. रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यावेळी उपस्थित होत्या. सुमारे तीन तास हा कौटुंबिक सोहळा रंगला.
दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हेच मोठं गिफ्ट
2004 नंतर यंदा प्रथमच राज ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयही भाऊबीजेनिमित्त घरी आल्याने देशपांडे कुटुंबात आनंद होता. “आज दोन्ही भाऊ एकत्र घरी आले, हीच खरी दिवाळी आहे. बहिणीसाठी भावाने घरी येणं हेच मोठं गिफ्ट आहे,’’ अशा भावना जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांनी व्यक्त केल्या.



























































