
जम्मू-कश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे तीन उमेदवार विजयी झाले, तर एक जागा भाजपने जिंकली. नॅशनल कॉन्फरन्सच्या विजयामुळे इंडिया आघाडीचे राज्यसभेतील संख्याबळ 3 ने वाढले आहे.
फेब्रुवारी 2021 पासून जम्मू-कश्मीरमधील राज्यसभेच्या चार जागा रिक्त होत्या. कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच यासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये राज्यातील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार चौधरी मुहम्मद रमजान, सज्जाद किचलू आणि गुरविंदर सिंग (शमी) ओबेरॉय विजयी झाले. तर भाजपचे सत शर्मा यांनी एका जागेवर विजय मिळवला. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला कॉँग्रेस, पीडीपी आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता.
भाजपकडे कमी संख्याबळ असतानाही तीन उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत उतरविले होते. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या चौधरी मोहम्मद रजवान यांनी भाजपचे अली मोहम्मद मीर यांचा पराभव केला. चौधरी यांना 58 तर मीर यांना 28 मते मिळाली. नॅशनल कॉन्फरन्सचे रजाद किचलू यांनी दुसरी जागा जिंकली. त्यांना 57 मते मिळाली. त्यांनी भाजपचे राकेश महाजन यांना पराभूत केले. नॅशनल कॉन्फरन्सचे तिसरे उमेदवार जी. एस. ओबेरॉय ऊर्फ शम्मी ओबेरॉय यांनाही विजय मिळाला. भाजपच्या सत शर्मा यांना 32 मते मिळाली तर नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराला 22 मते मिळाली.
भाजपला क्रॉस व्होटिंगचा फायदा
जम्मू-कश्मीर विधानसभेत भाजपचे 28 आमदार आहेत, मात्र राज्यसभा निवडणुकीत भाजपचे विजयी उमेदवार सत शर्मा यांना 32 मते मिळाली. सत्ताधारी आघाडी किंवा अपक्ष आमदारांनी केलेल्या क्रॉस व्होटिंगचा भाजपला फायदा झाल्याची चर्चा आहे.




























































