पोलिसांची हद्द झाली… दोन वर्षांच्या चिमुकलीला केले राड्यातील आरोपी; न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला झापले

court

18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांची नावे एफआयआरमध्ये कायद्यानुसार नोंदवता येत नाहीत. पण कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी मात्र हद्द पार केली असून दोन वर्षांच्या एका चिमुकलीला राडय़ातील आरोपी केले आहे. एवढेच नव्हे तर तिला कोर्टातदेखील हजर करण्यात आले. पण न्यायालयाने संतापून तपास अधिकाऱयालाच झाप झाप झापले. पोलिसांच्या या अजब कारभारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

मोहने परिसरात फटाक्यांच्या स्टॉलसमोर फटाके फोडण्यावरून दोन गटांमध्ये बुधवारी रात्री तुफान राडा झाला होता. स्थानिकांनी यावेळी पोलिसांवर दगडफेकदेखील केली. मोहन्यातील लहुजीनगर व मोहने गावातील तरुण अशा दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. त्यात काहीजण जखमीदेखील झाले. खडकपाडा पोलिसांनी दोन्ही गटांमधील 60 जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एफआयआरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीचा पोलिसांनी समावेश केला. त्या चिमुकलीच्या आईवरदेखील गुन्हा नोंदवण्यात आला.

वकिलाने आधारकार्डच दाखवले
या घटनेत जे जखमी झाले त्यांनाच आरोपी करण्यात आले. आज या आरोपींना कल्याणच्या न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी जखमी झालेल्या एका महिलेसोबत तिची चिमुकली मुलगीही न्यायालयात आली. तिला पाहताच न्यायमूर्ती संतापले. विशेष म्हणजे आरोपींच्या वकिलाने त्या चिमुकलीच्या नावाचे आधारकार्डच कोर्टापुढे सादर केले. मुलीचे नाव आरोपी म्हणून नोंदवल्याचे लक्षात येताच न्यायमूर्तींनी तपास अधिकाऱ्याला याचा जाब विचारला. दोन वर्षांच्या मुलीवर गुन्हा कसा काय दाखल होऊ शकतो, असा सवालदेखील केला. त्यावर तपास अधिकाऱयाची बोलतीच बंद झाली. आज दिवसभर पोलिसांच्या याच बेफिकिरीपणाची चर्चा न्यायालय पसिरात सुरू होती.