
>> रितेश पोपळघट
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने मांजरी येथे सुरू केलेला ‘रयत बाजार’ हा विक्री प्रयोग महाराष्ट्रातील आदर्श थेट विक्री केंद्र ठरला आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे इथे शेतकरी आपला माल थेट ग्राहक किंवा किरकोळ विक्रेत्यांना स्वत ठरवलेल्या दराने विकू शकतो. या प्रयोगामुळे दलालांची साखळी संपुष्टात आली आणि शेतकऱयाला थेट मोबदला मिळू लागला.
भारत हा कृषिप्रधान देश मानला जातो. आजही अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शेती आणि पूरक उद्योगांवर अवलंबून आहे. मात्र, शेतकरी वर्षानुवर्षे घाम गाळूनही आपल्या उत्पादनाचा खरा मालक आजही कधी ठरत नाही. बाजारपेठेतील दलाल, व्यापारी आणि मध्यस्थ यांची साखळी व्यवस्थेत भक्कम आणि इतकी मजबूत आहे की, शेतकऱयाला पिकाला योग्य दर मिळवणे जवळपास आजच्या डिजिटल युगातदेखील अशक्य आहे.
पूर्वीच्या बाजार व्यवस्थेत ‘हत्ता’ किंवा ‘गुप्त लिलाव’ पद्धती प्रचलित होती. या पद्धतीत पारदर्शकतेचा अभाव, वजनमापातील फसवणूक, घट-तूट आणि सुटसांडीच्या नावाखाली शेतकऱयांचा माल कापून घेणे हे सर्व व्यवहाराचा भागच मानले जात. बाजारातील चुकीच्या आणि अन्यायकारक व्यापार पद्धतींवर उपाय म्हणून देशभर विविध राज्यात पणन सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. आंध्र प्रदेश व तेलंगणामधील ‘रायतु बझार’ ही थेट विक्रीची यशस्वी संकल्पना ठरली. त्याच धर्तीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनेदेखील सोलापूर महामार्गाजवळ मांजरी येथे ‘रयत बाजार’ सुरू केला. हा उपबाजार अल्पावधीतच महाराष्ट्रातील आदर्श थेट विक्री केंद्र ठरला.
रयत बाजाराचे वैशिष्टय़ म्हणजे शेतकरी आपला माल थेट ग्राहक किंवा किरकोळ विक्रेत्यांना आपल्या मर्जीतील भावाने विकू शकतो. यामुळे दलालांची साखळी संपुष्टात आली आणि शेतकऱयाला थेट मोबदला मिळू लागला. व्यवहार रोख स्वरूपात आणि तत्काळ होत असल्याने आर्थिक फसवणूक थांबली. लहान शेतकरी, भाजीपाला उत्पादक, महिला हे उत्साहाने सहभाग घेऊ लागले.
मधल्या काळात संचालक मंडळ नसल्याने प्रशासकांच्या हस्तक्षेपाने प्रस्थापित व्यापारी, खोतीदार आणि मध्यस्थ यांनी या बाजारावर अप्रत्यक्ष ताबा मिळवला. व्यापारी शेतकऱयांकडून कवडीमोल भावाने माल विकत घेऊन तोच माल पुढे बाजारात दुप्पट भावाने विकायला लागले. ‘दुबार विक्री’वर प्रशासनाच्या नियमानुसार बंदी असताना त्याला पूर्णपणे हरताळ फासला गेला. अनेक शेतकऱयांना बाजारात प्रवेश नाकारण्यापर्यंतचा जुलमी प्रयत्न खोतीदार मंडळीकडून झाला, ज्यामुळे शेतकरी विरुद्ध खोतीदार-व्यापारी हा उभा संघर्ष निर्माण झाला.
शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नसल्याने त्यांनी बाजार समितीकडे तक्रारी केल्या, पण त्याकडे कुणी विशेष लक्ष दिले नाही. सुरुवातीला शेतकरी हितचिंतक असलेल्या तरुण संचालकांकडे शेतकरी आले तेव्हा हा प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीने उभे राहावे लागेल याची जाणीव त्यांना झाली. शेतकऱयांशी चर्चा केल्यानंतर शांततेच्या मार्गाने लढा देऊन आपला हक्क मिळवू हा विश्वास शेतकरी वर्गात निर्माण झाला.
मांजरी बाजारात शेतकऱयांवर अन्याय करणाऱ्या ‘खोतीदारांना प्रवेश नको’ अशी आक्रमक भूमिका शेतकरी वर्गाकडून घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतींकडून पाठिंबा पत्र घेण्यात आले, पण त्याचा विशेष फरक पडला नाही. त्यानंतर काही शेतकरीविरोधी संघटना, व्यापारी आणि खोतीदार यांचे ठेकेदार जागे झाले. त्यांनी उपोषणाचा बनाव केला, ज्याला तत्कालीन लोकप्रतिनिधींनी शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करून पाठिंबा दिला. नियमांचे उल्लंघन करून व्यापारी आणि खोतीदार यांना परवानगी द्यावी, असा शेतकरीविरोधी ठराव संचालक मंडळाने काढला.
आपल्यावर होत असलेला अन्याय आणि नुकसान पाहून शेतकरी पेटून उठले. सुरुवातीला शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत राहिले. पुढे विविध मार्गांनी शेतकरी रोष आणि दबाव वाढत गेल्याने एकापाठोपाठ संचालक मंडळातील अनेकांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली. विविध शेतकरी संघटनांनीदेखील आंदोलनाला पाठिंबा दिला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अखेर संचालक मंडळाने गुडघे टेकले आणि शेतकरी हिताचा निर्णय घेतला. शेतकऱयांनी एकजूट ठेवल्याने त्यांचा हक्काचा बाजार पुन्हा सन्मानाने मिळाला. या निर्णयामुळे बाजारात फक्त शेतकऱयांच्याच मालाला प्राधान्य मिळू लागले आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ झाली.
‘रयत बाजार’ ही केवळ एक विक्रीव्यवस्था नाही, ती शेतकऱयांच्या आत्मसन्मानाची चळवळ आहे. उत्पादक थेट विक्रेते कसे बनू शकतात, पारदर्शक व्यवहारातून शेतकरी व ग्राहक दोघांनाही कसा फायदा होतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा पणन उपक्रम.
आज शेतीमाल विक्रीची पारंपरिक यंत्रणा अजूनही अनेक ठिकाणी अन्यायकारक आहे. त्यामुळे अशा प्रयोगांचा विस्तार होणे आवश्यक आहे. राज्यभर आणि देशभर या संकल्पनेचा प्रसार झाला, तर शेतकऱयाला व्यापाऱयांच्या जाचातून मुक्ती मिळेल आणि खरी लोकशाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत अनुभवता येईल.
‘रयत बाजार’ ही कथा फक्त शेतकऱयांच्या संघर्षाची नाही, तर त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात आहे. शेतकरी आजही कायम चढ-उतार आणि यश अपयश याच्या उंबरठय़ावर आहे. रयत बाजारसारख्या उपक्रमाची आणि शेतकरी हक्क, संघर्षाची ही यशोगाथा अधिकच आश्वासक ठरेल एवढे नक्की.
(लेखक शेती क्षेत्रात कार्यरत असून ‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)
[email protected]





























































