रंगयात्रा – चित्रकाराने लिहिलेलं प्रेमपत्र द हे वेन

>> दुष्यंत पाटील

लंडनमधल्या नॅशनल गॅलरीमध्ये ठेवलेले द हे वेन’ हे चित्र इंग्लंडच्या निसर्गसौंदर्याचं, ग्रामीण जीवनाचं सर्वात मोठं प्रतीक. हरवत चाललेल्या ग्रामीण जगताला चित्रकाराने लिहिलेलं एक प्रेमपत्रच जणू. दोनशे वर्षे होऊनही या चित्राची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही.

जॉन कॉन्स्टेबल या विख्यात चित्रकाराचं ‘द हे वेन’ (The Hay Wain) हे चित्र इंग्लंडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हे चित्र लंडनमधल्या नॅशनल गॅलरीमध्ये ठेवलंय. दरवर्षी लाखो लोक हे चित्र बघायला येतात. कारण त्यांना हे चित्र इंग्लंडच्या निसर्ग सौंदर्याचं, ग्रामीण जीवनाचं सर्वात मोठं प्रतीक वाटतं! हे चित्र त्यांना भूतकाळातल्या एका शांत, सुंदर गावाची आठवण करून देतं. इंग्लंडमध्ये केलेल्या सर्वेक्षणांमध्ये (Polls) हे चित्र नेहमीच खूप वरच्या क्रमांकावर असतं. खरं तर हे नुसतं एक चित्र नाही, तर इंग्रजांच्या अस्मितेचा एक भाग आहे. या चित्राच्या प्रचंड लोकप्रियतेतून हेच दिसतं की, इंग्लंडच्या लोकांना आपली हिरवीगार शेतं आणि साध्या जीवनातला आनंद किती प्रिय आहे. चित्राला दोनशे वर्षे होऊन गेली असली तरी या चित्राची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही.

‘द हे वेन’ हे चित्र समजून घ्यायचं असेल तर आपल्याला दोनशे वर्षांपूर्वीच्या इंग्लंडमध्ये डोकावून बघावं लागेल. 1821 मध्ये इंग्लंडमध्ये खूप उलथापालथ होत होती. एका बाजूला औद्योगिक क्रांतीमुळे सगळीकडे कारखाने उभे राहत होते. शहरांमध्ये धुराचं साम्राज्य होतं. लोक खेडय़ातली शेती सोडून शहरात नोकरीसाठी धाव घेत होते. यंत्रं आल्यामुळे शेतीची आणि इतर पारंपरिक कामं कमी होत चालली होती. दुसऱ्या बाजूला या बदलामुळे अनेक लोकांना दुःख आणि भीती वाटत होती. याच काळात कॉन्स्टेबल यांनी हे चित्र काढलं. हे चित्र म्हणजे निसर्गावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कॉन्स्टेबलनं हरवत चाललेल्या ग्रामीण जगताला लिहिलेलं एक प्रेमपत्रच होतं! त्या काळचे इतर चित्रकार राजा, युद्ध किंवा जुन्या गोष्टींची भव्य चित्रं काढत होते. कॉन्स्टेबल यानं मात्र आपलं लक्ष ढग, पाणी, साधी घरं आणि रोजची कामं करणारे यांच्याकडे वळवलं.

‘द हे वेन’ चित्र स्टाऊर नदीच्या किनाऱ्याजवळचं एक शांत आणि रमणीय दृश्य दाखवतं. ही नदी कॉन्स्टेबलच्या सफोल्क आणि एसेक्स या मूळ गावांमधून वाहते. चित्राचा बराचसा भाग आकाशानं व्यापलाय. आकाशात बरेचसे ढग तरंगताना दिसतात. चित्रात डाव्या बाजूला झाडांमध्ये अर्धवट लपलेलं, छप्पर असलेलं एक साधं घर आहे. उजवीकडे एक उथळ नदी दिसते. तिच्या किनाऱ्यावर हिरवी झाडं आहेत, ज्यामुळे आपली नजर आपोआपच क्षितिजाकडे जाते. चित्राच्या मध्यभागी एक गाडी (ज्याला ‘वेन’ म्हणतात) आहे. ती नदीच्या उथळ पाण्यात उभी आहे. तिला तीन घोडे जोडलेले आहेत. ते पाणी ओलांडत असताना खाली वाकलेले दिसतात. गाडी घाईत नाही; ती शांतपणे पाण्यात विसावल्यासारखी उभी आहे. गाडीवर तिचा चालक म्हणजे शेतकरी बसलेला आहे, तर दुसरा माणूस घराच्या जवळ उभा आहे. एकूण वातावरण शांत, वेळ थांबल्यासारखं आहे.

हे चित्र जवळपास सहा फूट रुंद आणि चार फूट उंच आहे. त्यामुळे ते चित्र पाहताना आपण त्या ठिकाणी गेलोय असा भास होतो. कॉन्स्टेबलनं हे चित्र लंडनमध्ये बसून रंगवलं, पण त्याची रेखाटनं मात्र त्यानं मूळ ठिकाणी फिरून केली होती. ‘द हे वेन’ (The Hay Wain) म्हणजे गवत वाहून नेणारी गाडी. शेतातून नुकतंच कापलेलं गवत त्यातून जनावरांसाठी साठवण्यासाठी शेतीच्या इमारतींकडे नेलं जायचं. खेडय़ातल्या लोकांसाठी हे रोजचं काम होतं, पण कॉन्स्टेबलनं या साध्या कामाला आपल्या चित्राचा मुख्य विषय करत प्रतिष्ठा दिली. आजच्या काळात पर्यावरणप्रेमी मंडळी आंदोलन करताना कॉन्स्टेबलच्या या चित्राचा वापर करताना दिसतात याचं आश्चर्य वाटायला नको !

[email protected]