ठसा – सतीश शाह

>> दिलीप ठाकूर

ज्येष्ठ आणि चतुरस्र अभिनेते सतीश सतीश शाह यांनी मराठी व हिंदी चित्रपट, हिंदी मालिका, गुजराती चित्रपट अशा विविध माध्यमांतून काम केले. ते करताना आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातील अनुभव ते कधीच विसरले नाहीत. ऐंशीच्या दशकात आपण एखाद्या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली तरी त्याचा एखादा खास खेळ अन्य चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी आयोजित करण्याची पद्धत होती व नवीन काम मिळेल या आशेने तसा खेळ एखाद्या मिनी चित्रपटगृहात आयोजित करावा लागे. हे करणे महागडे ठरे आणि एखादा दिग्दर्शक त्याच चित्रपटातील अन्य एखाद्या कलाकाराबाबत विचारणा करीत असे. सतीश शाह यांना असेच अनुभव येत. पण कोणाला का असेना, पण एखाद्या चित्रपटातून भूमिका मिळतेय याचे सतीश शाह यांना समाधान मिळत असे. अशाच संघर्षाच्या दिवसांत सतीश शाह यांना मुशीर रियाज निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती’ (1982) या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत छोटी भूमिका मिळाल्याने सतीश शाह प्रचंड सुखावले होते. सतीश शाह यांनी छोटय़ा छोटय़ा भूमिका साकारत आपली वाटचाल केली. आपल्या देशात ऐंशीच्या दशकात दूरदर्शन मालिकांची पायाभरणी ज्यांनी केली त्यात सतीश शाह हे नाव पण अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विशेषतः ‘यह जो है जिंदगी’ या विनोदी मालिकेने ते घराघरांत पोहोचले आणि मनोरंजन विश्वात स्थिरावले. शाह त्यांच्या हलक्या-फुलक्या विनोदातून आपल्याला हसवत राहिले. ‘यह जो है जिंदगी’, ‘फिल्मी चक्कर’, ‘घरजमाई’, ‘ऑल द बेस्ट’ या त्याच्या मालिकांनी ऐंशीच्या दशकात धमाल उडविली. जनसामान्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. ‘हमारे पीए साहब’हीदेखील त्यांची एक मालिका.

चित्रपटाच्या बाबतीतही सतीश शाह यांची कारकीर्द समृद्ध व वैशिष्टय़पूर्ण आहे. सईद अख्तर दिग्दर्शित अरविंद देसाई की अजीब दास्तान’ (1978)  पासून सुरू झालेल्या त्यांच्या कारकीर्दीत मुझफ्फर अली दिग्दर्शित ‘गमन’ आणि उमराव जान, रमेश सिप्पी दिग्दर्शित  ‘शक्ती’, गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘अर्धसत्य’, आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेगे’, सुरजपुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है काwन’ आणि ‘हम साथ साथ है’, करण जोहर दिग्दर्शित ‘कल हो ना हो’, फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’, पुणाल कोहली दिग्दर्शित ‘फनाह’ तसेच ‘कभी हा कभी ना’, ‘यस बॉस’सारख्या लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे. बाबुभाई मिस्त्राr दिग्दर्शित जितेंद्रच्या ‘हातीमताई’सारख्या फॅन्टसी सिनेमात केलेली धमाल असो किंवा ‘वीराना’, ‘पुराना मंदिर’सारख्या रामसे बंधूच्या भयपटातल्या रहस्यमय भूमिका असो, सतीश शाह यांनी आपण बहुआयामी कलाकार आहोत हे कायमच अधोरेखित केले.

विनोदी अभिनेता या चौकटीत सतीश शाह अडकले नाहीत. अझिझ मिर्झा दिग्दर्शित ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’मधला टीव्ही चॅनलचा मालकसुद्धा तसाच होता. विनोदी भूमिकेमध्ये विविधता कशी दाखवायची हे सतीश शाह यांच्याकडून शिकावे, पण विनोदी अभिनेता असा शिक्का बसलेल्या कलाकाराला फारसे कोणीही गंभीर घेत नाही हे दुर्दैव. सामाजिक, मनोरंजक, काल्पनिक, खलनायकी, द्वय़र्थी अशा कोणत्याही प्रकारच्या विनोदातील त्यांचे टायमिंग मजेदार असे. तीच त्याची खासियत असे. एकीकडे स्वच्छ मनोरंजक चित्रपट आणि त्याच वेळेस अतिशयोक्तीपूर्ण मसाला मिक्स चित्रपट या दोन्हीत सतीश शाह यांनी आपल्या अष्टपैलूत्वाचा प्रत्यय दिला.  कुंदन शाह दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’सारख्या (1983)  ब्लॅक कॉमेडीमध्ये त्यांनी साकारलेल्या कमिशनर डिमेलोची डेड बॉडीसुद्धा खदखदून हसवून जाते. चाळीस वर्षांनंतरही या चित्रपटाची चर्चा होत आहे हेदेखील विशेष. 2004 साली मनोरंजन उपग्रह वाहिनीवरच्या ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मधला इंद्रवदन आणि त्याच्या कुटुंबाची धमाल-मस्ती मनसोक्त, मनमुराद आनंद देणारी ठरली.

सतीश शाह यांनी काही मराठी चित्रपटांतही भूमिका साकारल्या. सतीश कुलकर्णी निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘गंमत जंमत’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर गिरीश घाणेकर दिग्दर्शित ‘वाजवा रे वाजवा’मध्ये तर थेट अशोक सराफ यांच्यासोबत विनोदाची जुगलबंदी रंगली. दादा कोंडके अभिनित व दिग्दर्शित ‘मला घेऊन चला’ या मराठी चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत धमाल उडविली म्हणून दादा कोंडके यांनी आपल्या ‘आगे की सोच’ या हिंदी चित्रपटातही सतीश शाह यांना पुन्हा एकदा संधी दिली.

पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित असलेल्या ‘गोळाबेरीज’ या चित्रपटात पेस्टनकाकांची छोटी भूमिका पण त्यांनी केली. सतीश शाह यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अजून एक फार पुणाला न माहिती असलेला पैलू म्हणजे ते उत्पृष्ट रायफल शूटर होते. त्या खेळात चांगले प्रवीण होते.  क्रिकेटचेही ते विलक्षण चाहते होते. स्टेडियमवर जाऊनही सामना एन्जॉय करीत. मात्र सतीश शाह एक अष्टपैलू अभिनेता ही त्यांची खरी ओळख होती, ती त्यांनी अजरामर करून ठेवली.