अभिनेते सतीश शाह यांना अखेरचा निरोप

किडनीच्या आजाराने निधन झालेले ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना रविवारी अखेरचा निरोप देण्यात आला. विलेपार्ले पश्चिम येथील पवन हंस स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टीव्ही मालिका, रंगभूमी आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे सतीश शाह यांचे शनिवारी हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. शाह यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. आज शाह यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना निरोप देण्यासाठी बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. टीव्हीवर त्यांच्या मुलाची भूमिका केलेले राजेश कुमार, निर्माते अशोक पंडित यांनी शाह यांच्या पार्थिवास खांदा दिला. त्यावेळी वातावरण भावूक झाले होते. सतीश शाह यांच्या सहकलाकार राहिलेल्या रुपाली गांगुली यांना अश्रू आवरता आले नाहीत.

नसिरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, रत्ना पाठक-शाह, पंकज कपूर, सुरेश ओबेरॉय, रणजीत, स्वरूप संपत, पुनम ढिल्लन, टिकू तलसानिया, अवतार गिल, दिलीप जोशी, नील नितीन मुकेश आदी कलाकारांनी शाह यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनीही शाह यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.