
कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळचा ठावठिकाणा समोर आला आहे. हिंदूस्थानातील ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घायवळ हा व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. नीलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि अन्य साथीदारांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुह्यात त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली आहे. घायवळ याने ‘गायवळ’ या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते.






























































