
लहान विद्यार्थ्यांना तसेच अगदी मोठ्या माणसांना देखील अवकाशाबद्दल नेहमीच कुतूहल असते. हे कुतूहल अधिक जागृत व्हावे आणि त्यातून अवकाश विज्ञान सोप्या पद्धतीने कळावे यासाठी देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात चार नवीन मॉडेल्स आणण्यात आली असल्याची माहिती देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र प्रतिकृती
या मॉडेल मधून पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण, ऋतू, दिवस-रात्र, ग्रहणे, अमावास्या आणि पौर्णिमा, चंद्राची कक्षा, अधिक महिना, राशी संक्रमण, चंद्र महिना अशा मूलभूत संकल्पना विषद होतात.
तिथी मॉडेल
हे मॉडेल आहे तिथी आणि नक्षत्रे या विषयाची प्रतिकृती आहे. हे चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या गतीवर आधारित भारतीय पंचांगातील काही संकल्पना स्पष्ट करते जसे शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, सूर्याचे नक्षत्र स्थान, सायन व निरयन.
अभिमुखता मॉडेल
पृथ्वीची परांचन गती समजून घेण्यासाठी हे मॉडेल मदत करते. आताचा ध्रुव तारा काही हजार वर्षांनंतर त्या ठिकाणी रहाणार नाही. तसेच पंचांगातील महिन्यांची नावे देण्याचा नियम पण यामुळेच बदलावा लागेल. ‘विषूव बिंदू’ दर ७२ वर्षांनी एक अंश कसा सरकतो हे या प्रतिकृतीतून बघता येते.
राहू केतू मॉडेल
राहू व केतू या संकल्पनेचे खगोलीय स्पष्टीकरण ही प्रतिकृती करते. राहू व केतू ज्या कक्षेत फिरतात ती पण बदलत असते. एक फेरी पूर्ण व्हायला १८.६ वर्षे कशी लागतात हे कळते तसेच ग्रहणे समजण्यासही ही प्रतिकृती मदत करते.
ही सर्व मॉडेल्स सुप्रसिद्ध अवकाश अभ्यासक रवींद्रजी गोडबोले यांनी थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बनवलेली आहेत. सृजन विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी कटीबद्ध आहे. या मॉडेल्सच्या माध्यमातून विज्ञान केंद्रामध्ये लवकरच अवकाश विषयीची वर्कशॉप्स सुरू करण्यात येणार आहेत त्याचा लाभ कोकणातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सदानंद भागवत यांनी केले आहे.




























































