
>> मेधा पालकर
डी. ई. एस मुरलीधर लोहिया मातृमंदिर पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षिका निशा जोशी यांनी संस्कृत शिक्षणाचं अनोखं विश्व साकारलं आहे. आजी श्लोक, स्तोत्रं म्हणायची आणि त्या गोड उच्चारांनी त्यांचं मन संस्कृतकडे ओढलं गेलं. धुळ्याच्या महाविद्यालयात संस्कृत विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आणि शिक्षिका म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र खऱया अर्थानं संस्कृतचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला तो कोरोना काळात! मुलांपर्यंत ऑनलाईन माध्यमातून संस्कृत पोहोचवायचं ठरवलं. डी.ई.एस. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या कल्पनेतून ‘संस्कृत माधुरी’ या यूटय़ूब चॅनेल साकारले.
गोष्ट सांगत संस्कृत शिकवणं
एखादी गोष्ट जर संस्कृतमध्ये सांगितली तर मुलांना ती रंजकतेने समजते, लक्षात राहते हे लक्षात आलं आणि मग काय संस्कृतमध्ये तयार झाले 76 पेक्षा अधिक व्हिडीओज! यामध्ये सणांची माहिती, संस्कृतीचं महत्त्व, जनरल नॉलेज – फळं, फुलं, प्राणी, अन्न, रंग, वस्तू आणि अगदी देवीच्या नवरात्रातील नऊ रूपांचंही संस्कृत रूपांतर केलं.
शाळेपासून सोशल मीडियापर्यंत…
शाळेतील असेंब्ली असो, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन देशभक्तीपर श्लोक, सुविचार यांमुळे संस्कृतचा वापर अधिकच वाढला. मातृपूजन, नवरात्र, गणेशोत्सव यांसारख्या सणांना अनुसरून संस्कृतमधून साजरे केले गेले. आज राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्रिभाषा सूत्र आणलं जातंय, पण डी.ई.एस. शाळेत हे काम सुरुवातीपासूनच सुरू आहे. मिनी के.जी पासूनच संस्कृत भाषा शिकवली जाते. संस्कृतचे श्लोक उच्चारले की, उच्चार शुद्ध होतात, भाषेवर प्रभुत्व येतं आणि स्मरणशक्ती वाढते हे अनुभवातून सिद्ध झालं आहे.
संस्कृतमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा
गणपतीची बारा नावं, त्यांचे अर्थ, दुर्गासप्तशतीतील अध्याय, देवीचे रूप, संस्कृतमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा अनेक गोष्टी या चॅनेलवर उपलब्ध आहेत.
संस्कृतची गोडी अधिक मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून नवनवीन कल्पना राबवायच्या आहेत, असं निशा जोशी म्हणाल्या. संस्कृत ही केवळ एक प्राचीन भाषा नाही, तर ती संवेदनशीलता, शिस्त आणि संस्कारांचं मूळ आहे हे लहानग्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. लिखित स्वरूपात ही छोटी-छोटी पुस्तके तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. गाथासप्तशतीमध्ये जे देवीचे अवतार आहेत, देवीने असुरांचं कसं निर्दलन केलं आहे हे अध्यायाप्रमाणे संस्कृतमध्ये सांगण्याचा माझा प्रयत्न असेल.
बाह्यरूपावर भाळण्यापेक्षा अंतर्मनाला ओळखा
जलनिधौ जननं धवलं वपुर्मुररिपोरपि पाणितले स्थिति ।।
इति समस्त-गुणान्वित शङ्ख भोः! कुटिलता हृदयान्न निवारिता ।।
हे शंखा! तुझे जन्मस्थान समुद्रासारखे पवित्र, तुझे शरीर शुभ्र आणि तेजस्वी, तुला स्वत श्रीविष्णूंच्या हातात स्थान मिळाले आहे अशा सर्व गुणांनी तू संपन्न आहेस. तरीदेखील तुझ्यातील कुटिलता (वाकडेपणा, आतले वळण) नष्ट झालेली नाही!
कवि शंखाच्या माध्यमातून मानवी स्वभावावर भाष्य करतो. शंख दिसायला सुंदर, शुभ्र, देवाच्या हातात असला तरी त्याची रचना आतून वाकडी आहे. त्याचप्रमाणे काही लोकांचे जीवन, स्थान, प्रतिष्ठा, बाह्य रूप हे अत्यंत सुंदर असते, पण त्यांच्या हृदयातील वक्रता, अहंकार, कुटिलपणा कायम राहतो.
डॉ. समिरा गुजर-जोशी




























































