
हिंदुस्थानी क्रिकेटसाठी आज भव्य दिवस असताना क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि अंबाती रायडू यांच्यासोबत क्रिकेट खेळलेल्या त्रिपुराचे माजी अष्टपैलू खेळाडू राजेश बानिक (40) यांचे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. 31ऑक्टोबरला रात्री पश्चिम त्रिपुरातील आनंदनगर येथे झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने अगरतला येथील जीबीपी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.
राजेश बानिक 2002- 03 मध्ये त्रिपुरासाठी रणजी ट्रॉफीमध्येही खेळले होते. त्यांनी 16 वर्षांखालील स्टेट टीमचे निवडकर्ता म्हणून काम केले. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशन (टीसीए) ने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. टीसीएचे सचिव सुब्रत डे म्हणाले, “आम्ही एक प्रतिभावान क्रिकेटपटूला गमावले. हे खूप दुर्दैवी आहे. ते आमचे सर्वोत्तम ऑलराउंडर खेळाडूंपैकी एक होते. या घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, असे ते म्हणाले.
राजेश यांनी खूप कमी वयातच क्रिकेच विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बानिक यांनी कॉस्टकटर वर्ल्ड चॅलेंज 2000 साठी हिंदुस्थानच्या अंडर 15 संघात स्थान मिळवले. आणि देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
राजेश यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

























































