
चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या प्रदीर्घ विरामानंतर येणारा काळ सांस्कृतिक व सामाजिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा विशेषकरून लग्नसराईचा काळ असतो. आज पंढरपूरमध्ये तुळशीचे लग्न झाले, उद्या इतर ठिकाणी तुलसीविवाह पार पडेल. त्यानंतर विवाहाच्या मंगलपर्वाची अधिकृत सुरुवात मुहूर्तांप्रमाणे 18 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि सनई-चौघडय़ांचे सूर सर्वत्र घुमतील. त्यामुळे लग्नेच्छुक आणि त्यांच्या पुटुंबीयांची लगबग सुरू झाली आहे.
तुळशीच्या लग्नानंतर विवाहांचा मोसम सुरू होतो. आईवडील लग्नेच्छुक मुला-मुलींच्या विवाहाच्या तयारीला लागतात. पंचांगानुसार यंदा 18 नोव्हेंबरपासून पुढील वर्षीच्या जुलै 2026 पर्यंत लग्नासाठी 68 शुभमुहूर्त आहेत. 18 नोव्हेंबरचा पहिला मुहूर्त आहे. जुलै 2026 पर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत.
जानेवारीत मुहूर्त नाही
चालू नोव्हेंबर आणि पुढील वर्षीच्या फेब्रुवारी, मार्च महिन्यात सर्वाधिक शुभमुहूर्त आहेत. डिसेंबरमध्ये फक्त पाच मुहूर्त आहेत तर जानेवारीमध्ये लग्नकार्यासाठी एकही शुभमुहूर्त नाही. गुरू आणि शुक्र हे दोन ग्रह अस्तंगत असल्यामुळे यंदा विवाह मुहूर्त कमी असल्याचे ज्योतिषी सांगतात.
व्यावसायिकांची सुगी
लग्नकार्यासंबंधीच्या व्यवसायांना सुगीचे दिवस येणार आहेत. डेकोरेटर्स, मंगल कार्यालये, कॅटरर्स, सराफा बाजार, कपडय़ाची दुकाने, भांडय़ांची दुकाने, पह्टोग्राफर, बॅण्डबाजा आदी व्यावसायिकांसाठी हा सुवर्णकाळ ठरणार आहे.

























































