
मुंबईत अनेक वकील असून आर्थिक अडचणीमुळे त्यांना भाडय़ाच्या घरात राहावे लागते. न्यायालयात सर्वसामान्यांची बाजू मांडणाऱया वकिलांना परवडणाऱया दरात हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारला प्रस्ताव द्या, अशी मागणी करत अॅड. विनोद सातपुते यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाला पत्र लिहिले आहे.मुंबई उपनगरातील मालाड येथे वन क्षेत्राला लागून असलेल्या सर्व्हे क्र. 239, सीटीएस क्रमांक 827 या जमिनीचा तुकडा गेल्या काही वर्षापासून सरकारी अधिकाऱयांनी वापरात आणला नाही. वकिलांचा मुंबईत राहण्याचा खर्च जास्त असल्याने भाडय़ाने राहताना आर्थिक संघर्ष करावा लागतो. त्यामुळे 10 हजार वकिलांसाठी परवडणारी घरे बांधण्यासाठी सदर जागा मिळावी म्हणून सरकारकडे प्रस्ताव देण्यात यावा, अशी मागणी अॅड. विनोद सातपुते यांनी केली आहे. मानखुर्द येथेही भूखंड मिळावा यासाठी बार कौन्सिलने प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे.



























































