लेख – जिवावर बेतणारे ऑनलाइन गेम्स!

>> दादासाहेब येंधे

टाइमपास म्हणून खेळले जाणारे ऑनलाइन खेळ आता तरुणांच्या जिवाशी खेळू लागले आहेत. तरुणांना इंटरनेटच्या माध्यमातून गेम्स खेळण्याचा छंदच लागला आहे. त्यांच्या या छंदामुळे बाजारात कन्सोल्स व पोर्टेबल डिव्हाईसच्या ऑनलाइन भागीदारीत वाढ झाली, परंतु ते ऑनलाइन गेम्स आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. मोबाईल गेमचा मुलांना लागलेला लळा पालकांना सर्वच दृष्टीने महाग पडू लागला आहे.

सध्या शालेय पिढी मीडियाच्या आहारी गेली असून मैदानी खेळांना विसरत चालली आहे. पूर्वी साधेसोपे असणारे खेळ आता ऑनलाइन, रिव्हर्स चॅलेंज आणि लेव्हलच्या चौकटीत अडकल्याने हेच गेम्स जिवावर बेतल्याच्या घटना समोर येत आहेत. गेम्सच्या आहारी गेल्याने शालेय पिढीतील मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आहेत.

2015-2016 या एका वर्षात जगात ऑनलाइन गेमच्या लेव्हल स्वीकारत, ते सांगतील तसे करत 130 मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. इंग्लंड आणि दुबईमधल्या शाळांनी काही वर्षांपूर्वी पालकांना ’ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ नावाच्या खेळापासून आपल्या मुलांना वाचविण्याच्या सूचना दिल्या होत्या. जगभरातील अनेक किशोर वयातील मुलांचा या गेमने जीव घेतला होता. अशाच अनेक भयानक खेळांकडे 14-15 वर्षे वयोगटातील मुले जास्त आकर्षित होताना दिसत आहेत.

लहान मुलांना आणि तरुणाईला ऑनलाइन गेमचे व्यसन लागलेले असून त्यांच्या आहारी जाऊन अनेक शारीरिक आणि मानसिक विकार त्यांना जडलेले आहेत. ब्ल्यू व्हेल, कॅंडी क्रश, रमी, तीन पत्ती आणि पोकोमन गो अशा वेगवेगळ्या गेम्सने तरुणाईला वेड लावले आहे. जगभरातल्या स्मार्टफोन धारकांची सध्या ही अशी अवस्था झालेली आहे. कन्सोलसाठी पैसे आकारणाऱया गेम कंपन्यांनी मोबाईलवर हे गेम उपलब्ध करून देताना पैसे आकारले आहेत, पण पैसे भरूनही गेम खेळणाऱयांची संख्या खूप मोठी आहे.

टाइमपास म्हणून खेळले जाणारे ऑनलाइन खेळ आता तरुणांच्या जिवाशी खेळू लागले आहेत. तरुणांना इंटरनेटच्या माध्यमातून गेम्स खेळण्याचा छंदच लागला आहे. त्यांच्या या छंदामुळे बाजारात कन्सोल्स व पोर्टेबल डिव्हाईसच्या ऑनलाइन भागीदारीत वाढ झाली, परंतु ते ऑनलाइन गेम्स आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. मोबाईल गेमचा मुलांना लागलेला लळा पालकांना सर्वच दृष्टीने महाग पडू लागला आहे. या गेमच्या व्यसनापायी मुले तासन्तास एकाच जागी बसून स्वमग्न होऊ लागले आहेत. गेमच्या नादात त्यांना कशाचेही भान राहिले नाही. मुलांचे मोबाईलवरील गेममुळे अभ्यासात लक्ष घालणे सोडून दिले आहे. शालेय वयातील मुलांना अभ्यासातून ब्रेक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल, टॅब देणे किंवा मग तणावातून रिलॅक्स होण्यासाठी गेम खेळण्याची सवय अस, हे टाइमपास म्हणून गेमिंग करणे धोक्याचे बनत चालले आहे. टॅब, कॉम्प्युटर, लॅपटॉप व मोबाइलवर ऑनलाइन गेम्स खेळणाऱया लहान मुले, मुली, तरुण, तरुणींना दृष्टिदोष, निद्रानाश, थकवा, चिडचिडेपणाचा  त्रास सुरू होतो. त्यांना बऱयाच समस्यांना तोंड द्यावे लागते. झोपेत असतानाही त्यांना वेगवेगळे भास होतात. विस्मरण, एकाग्रतेचा अभाव, ग्रहणशक्ती कमी होणे, योग्य निर्णय घेता न येणे असे गंभीर परिणाम होण्याची त्यांना सतत भीती वाटते.

राजस्थानातील श्रीगंगानगर जिह्यात एका 56 वर्षीय आजीने नातवाला गेम खेळण्यास विरोध केला. आजीने नातवाला सांगितलेलं पटलं नाही. मग नातवाने आजीलाच संपवलं.आरोपीचं नाव मनीष चुघने असे आहे, तर त्याच्या आजीचं नाव द्रौपदी असे होते. मध्य प्रदेशातूनही मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथील इंदूरच्या एमआयजी पोलीस ठाणे हद्दीतील एका 12 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ऑनलाइन गेमच्या नादात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एकमेकांतील संवाद हरवणे होय. त्यामुळे आज सुसंवाद आपल्या कुटुंबीयांसोबत, आप्तेष्ट आणि मित्रपरिवारांसह करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आजही मोबाईलच्या आहारी गेलेल्या अनेक तरुण आणि लहान मुलांवर मानसोपचारांद्वारे उपचार सुरू असल्याची अनेक उदाहरणे आहेत. दिवसभर ऑफिसला जाणाऱया पालकांमुळे लहान वयातच बळावत चाललेला एकटेपणा या मुलांना गेमच्या आहारी जाण्यास भर पाडत आहे. पालकांनी मुलांना वेळ द्यावा. त्यांना समजून घ्यावे. त्यांचे ऐकून घ्यावे आणि त्यांच्यावर दबाव न आणता गेमिंगच्या आभासी दुनियेपासून त्यांना दूर जाण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून ही मुले भविष्यात मानसिक रुग्ण होण्यापासून किंवा गेमिंगमुळे स्वतःच्या जिवाला दुरावण्यापासून परावृत्त होतील.

रात्र ही शांत झोपण्यासाठी आहे. उत्तम मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी कार्यक्षमतेसाठी आणि जीवनाप्रती आशावाद वाढवण्यासाठी योग्य वेळेतील नैसर्गिक शांत गाढ झोप हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. आयुष्य म्हणजे इंटरनेट नव्हे, तो फक्त एक छोटा भाग आहे. मोबाईल, इंटरनेटचा वापर मर्यादितच करा. गरजेपुरताच करा. रात्री उशिरापर्यंत इंटरनेटवर गेम खेळणे, बघणे तत्काळ थांबवा. इंटरनेटचे व्यसन लागले असेल तर ते लगेच मान्य करा. त्यावर योग्य तो उपचार घ्या. मन मोकळं करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी आभासी माध्यमांचा वापर बंद करा. प्रत्यक्ष माणसांसोबत बोला, भेटा, फोन खोटा खरे भेटा हे तत्व अंगीकारा.

भावनेच्या भरात चुकून किंवा गैरप्रकाराने तुम्ही तुमची व्यक्तिगत माहिती इंटरनेटवर शेअर केली असल्यास घाबरू नका. तुमच्या मनातील भीतीवर गैरप्रकार आणि कुविचारी प्रवृत्ती जगत असतात. सरळ सरळ पोलिसांची मदत घ्या. तुमची गोपनीयता राखली जाते. कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा छळ सहन करू नका. जगात खूप चांगली माणसं आहेत ती तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहेत. हे सत्य आहे हे कायम लक्षात ठेवा. नकारात्मक गाणी, प्रोग्राम आणि विचारांपासून स्वतःला नेहमी दूर ठेवा. प्रेरणादायी गोष्टी खूप आहेत. त्याकडे लक्ष द्या. सामाजिक कार्यांमध्ये भाग घ्या. त्यात जास्त समाधान आहे आणि ती काळाची गरजदेखील आहे. चूक मान्य करण्याची हिंमत ही आत्महत्या करण्यापेक्षा जास्त सन्माननीय असते. चुका लपवण्याच्या नादात आणखी गंभीर चुकांमध्ये तुम्ही अडकत जाल. आपल्या घरातील माणसांसोबत मनमोकळेपणाने बोला. त्यांची मदत घ्या. जीवन हे फक्त स्वतःपुरते नाही. आपल्यावर काही जबाबदाऱया आहेत. आपण कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे आणि मानवतेचे काहीतरी देणे लागतो याचे सतत भान बाळगा. इंटरनेट, मोबाईल गेमपेक्षा ते जास्त गरजेचे आहे.