
दुबार मतदार यादीचा विषय गेल्या पंचवीस वर्षांपासूनचा आहे, संपूर्ण यादी स्क्रॅप केल्याशिवाय दुबार मतदान कमी होणार नाही, पुन्हा घरोघरी जाऊन संपूर्ण मतदार यादी बनवली पाहिजे, असे मत सत्ताधारी पक्षाचे नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी व्यक्त केले.
मतदार यादीमध्ये मोठय़ा प्रमाणात बोगस मतदार असल्याचे पुरावेच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. सत्ताधारी पक्षांतील आमदारांनीही त्यांच्या मतदारसंघात असाच प्रकार निदर्शनास आल्याचा दावा केला. आता खुद्द महसूलमंत्री बावनपुळे यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. बावनपुळे म्हणाले की, दुबार -तिबार मतदारांवर भाजपचाही आक्षेप आहे. दुबार मतदार यादी ही आजपासून नाही, तर गेल्या 25 वर्षांपासून आहे. जोपर्यंत संपूर्ण यादी स्क्रॅप होणार नाही तोपर्यंत दुबार मतदार कमी होणार नाहीत.


























































